Pinky Mali Technical Failure Warning : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताने केवळ राजकारणच नाही, तर अनेक सामान्यांची स्वप्नेही धुळीस मिळवली आहेत. या दुर्घटनेत प्राण गमावलेली फ्लाइट अटेंडंट पिंकी माळी हिच्या अकाली जाण्याने मुंबईतील वरळी परिसरात शोककळा पसरली आहे.
अभिमानाने सांगितलेली ती ड्युटी ठरली 'शेवटची'
नेहमीप्रमाणे मोठ्या उत्साहात कामावर जाण्यासाठी निघालेली पिंकी माळी आपल्या वडिलांना म्हणाली होती, "बाबा, आज अजित पवार यांच्या फ्लाइटमध्ये माझी ड्युटी आहे!" आपल्या मुलीला मोठ्या नेत्याच्या जबाबदारीसाठी नियुक्त केल्याचा सार्थ अभिमान तिचे वडील शिवकुमार यांना होता. परंतु, ती नांदेडच्या दौऱ्यावर जात असल्याचे सांगून घराबाहेर पडलेली पिंकी आता कधीच परतणार नाही, या विचाराने वरळीचा सेंच्युरी मिल परिसर पूर्णपणे सुन्न झाला आहे. बुधवारी सकाळी टीव्हीवर अपघाताच्या बातम्या पाहिल्या आणि माळी कुटुंबाचा काळजाचा ठोकाच चुकला.
तांत्रिक त्रुटींबाबत दिला होता इशारा
पिंकीचा भाऊ करण याने व्हीएसआर (VSR) कंपनीच्या कामकाजावर आणि विमानांच्या देखभालीवर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. धक्कादायक बाब म्हणजे, साधारण 2 महिन्यांपूर्वीच पिंकीने एका उड्डाणादरम्यान मोठा अपघात टळल्याचे कुटुंबाला सांगितले होते. विमानातील तांत्रिक बिघाड आणि वैमानिकांच्या अनुभवाचा अभाव याबद्दल तिने चिंता व्यक्त केली होती. इतकेच नाही तर, खुद्द अजित पवार यांनीही त्यावेळच्या सेवेबद्दल आपली नाराजी नोंदवली होती, अशी माहिती आता समोर येत असून यामुळे कंपनीच्या हलगर्जीपणावर संशय व्यक्त केला जात आहे.
हेही वाचा - Mahadev Jankar On Ajit Pawar Death : "...अन् दादांसोबतचा तो प्रवास करता आला नाही" महादेव जानकर अजित पवारांच्या विमानातून करणार होते प्रवास
वडिलांचा 'तो' आग्रह आणि पिंकीची जिद्द
पिंकीला मुळात मॉडेलिंग क्षेत्रात आपले करिअर करण्याची आवड होती. मात्र, तिचे वडील शिवकुमार यांनी तिला सुरक्षित भविष्य मिळावे म्हणून एअर होस्टेस होण्याचा आग्रह धरला होता. वडिलांचा शब्द मानून तिने या क्षेत्रात कठोर परिश्रम घेतले आणि स्वतःचे स्थान निर्माण केले होते. मंगळवारी रात्री शेवटच्या वेळी भावाशी बोलताना ती खूप आनंदी होती. मात्र, नियतीने घातलेला घाला इतका क्रूर होता की, तिच्या जिद्दी प्रवासाला अशा प्रकारे अचानक पूर्णविराम मिळेल, असे कोणालाही वाटले नव्हते.
समाजसेवेचे स्वप्न राहिले अपूर्ण
पिंकी केवळ स्वतःच्या प्रगतीचा विचार करणारी तरुणी नव्हती, तर तिला समाजासाठी काहीतरी मोठे करण्याची ओढ होती. मंगळवारी रात्री भावाशी गप्पा मारताना तिने आपली एक खास इच्छा व्यक्त केली होती. झोपडपट्टीतील गरीब आणि शोषित मुलांच्या शिक्षणाचा सर्व खर्च स्वतः उचलण्याचा संकल्प तिने सोडला होता. "मी आता स्वतःच्या पायावर उभी आहे, मला या मुलांचे भविष्य सुधारायचे आहे," असे तिने आत्मविश्वासाने सांगितले होते. मात्र, समाजाच्या कल्याणाचे हे सुंदर स्वप्न आज तिच्या पार्थिवासोबत विलीन झाले आहे.
एक उमद्या प्रवासाचा करुण अंत
पिंकीच्या निधनामुळे वरळीतील तिच्या मित्रमैत्रिणींमध्ये आणि शेजाऱ्यांमध्ये मोठी शोककळा आहे. ज्या एअर होस्टेसच्या गणवेशात ती दिमाखात परिसरातून जायची, तिची आठवण काढून अनेकांना अश्रू अनावर होत आहेत. विमानातील तांत्रिक बिघाडाकडे दुर्लक्ष केल्यामुळेच आपल्या मुलीचा जीव गेला, असा आरोप तिचे कुटुंबीय करत आहेत. अजित पवारांसारख्या मोठ्या नेत्यासोबत असलेल्या सुरक्षितता यंत्रणेत अशा त्रुटी कशा राहिल्या, याचा शोध आता पोलीस घेत आहेत.
हेही वाचा - Final Flight : प्रदीर्घ सेवेनंतर कॅप्टन ओम यांनी घेतली 'शेवटची झेप'; आपल्या 23 वर्षांच्या सहकाऱ्याला केलं 'असं' गुडबाय