Pakistan Petrol Diesel Price Hike: आधीच राजकीय आणि आर्थिक अस्थिरतेचा सामना करणाऱ्या पाकिस्तानमधील जनतेचे कंबरडे आता इंधनाच्या दरवाढीने मोडले आहे. शुक्रवारी पाकिस्तान सरकारने पेट्रोल आणि हाय-स्पीड डिझेलच्या किमतीत प्रति लिटर 55 रुपयांची ऐतिहासिक वाढ करून सर्वांनाच धक्का दिला आहे. देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच इंधनाचे दर एकाच वेळी सुमारे 20 टक्क्यांनी वाढवण्यात आले असून, यामागे इराण, इस्रायल आणि अमेरिका यांच्यात सुरू असलेल्या युद्धाचा मोठा परिणाम असल्याचे सांगितले जात आहे.
पेट्रोल आणि डिझेलचे नवे दर गगनाला
या दरवाढीनंतर पाकिस्तानमध्ये इंधनाचे दर सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेले आहेत. नव्या दरवाढीनुसार, डिझेल 280.86 रुपयांवरून आता 335.86 पाकिस्तानी रुपये प्रति लिटर झाले आहे (20 टक्के वाढ). तर पेट्रोल 266.17 रुपयांवरून आता थेट 321.17 पाकिस्तानी रुपये प्रति लिटरवर पोहोचले आहे (17 टक्के वाढ). या दरवाढीमुळे वाहतूक व्यवस्था कोलमडण्याची भीती निर्माण झाली असून जीवनावश्यक वस्तूंचे भावही वाढण्याची शक्यता आहे.
होर्मुझची सामुद्रधुनी आणि आंतरराष्ट्रीय संकट
पाकिस्तानचे पेट्रोलियम मंत्री अली परवेझ मलिक यांनी या संकटासाठी आंतरराष्ट्रीय परिस्थितीला जबाबदार धरले आहे. पाकिस्तान आपल्या तेल पुरवठ्यासाठी प्रामुख्याने होर्मुझच्या सामुद्रधुनीवर अवलंबून आहे. मात्र, इराण आणि अमेरिका-इस्रायल संघर्षामुळे या मार्गावरील पुरवठा साखळी विस्कळीत झाली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किमतीत 50 ते 70 टक्क्यांनी वाढ झाल्याने हा बोजा जनतेवर टाकण्याशिवाय सरकारकडे पर्याय उरला नसल्याचे मलिक यांनी स्पष्ट केले.
नागरिकांमध्ये संताप आणि टंचाईची भीती
सरकारी निर्णयामुळे पाकिस्तानातील नागरिकांमध्ये प्रचंड संताप आणि निराशेचे वातावरण आहे. पेट्रोल पंपांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या असून अनेक ठिकाणी इंधनाचा साठा संपल्याच्या तक्रारी येत आहेत. सरकारने कृत्रिम टंचाई निर्माण करणाऱ्या साठेबाजांवर कठोर कारवाईचा इशारा दिला आहे. "हे संकट किती काळ टिकेल याची शाश्वती नाही," असे मंत्र्यांनी म्हटल्याने लोकांमध्ये भीती अधिकच वाढली आहे. सध्या दोन तेलवाहू जहाजे पर्यायी मार्गाने येत असल्याचे सांगण्यात आले असले तरी, तात्काळ दिलासा मिळण्याची चिन्हे धूसर आहेत.