मुंबई: मुंबईतील बोरिवली पश्चिम परिसरातील मनोरी समुद्रकिनाऱ्यावर अडकलेल्या एका जहाजात चोरी करण्यासाठी गेलेल्या चौघांचा गुदमरून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. चार महिन्यांपूर्वी वादळी वाऱ्यासह झालेल्या मुसळधार पावसामुळे एक विदेशी जहाज समुद्रकिनाऱ्यावर येऊन अडकले होते. मागील काही दिवसांपासून या जहाजावर वारंवार चोरी होत असल्याची प्राथमिक माहिती पोलिसांच्या तपासातून समोर आली आहे.
पोलिसांच्या प्राथमिक माहितीनुसार, यापूर्वी दोन वेळा चोरट्यांनी जहाजात प्रवेश करून मोठ्या प्रमाणात मुद्देमाल लंपास केला होता. पहिल्या घटनेत सुमारे अडीच लाख रुपये, तर दुसऱ्यांदा सुमारे पाच लाख रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेल्याची माहिती आहे. यानंतर तिसऱ्यांदा चोरी करण्यासाठी आठ जणांची टोळी स्पीडबोटच्या मदतीने जहाजापर्यंत पोहोचल्याचे सांगण्यात येत आहे.
या टोळीतील एक जण स्पीडबोटमध्ये थांबला, तर सात जण जहाजाच्या आतील भागात गेल्याची प्राथमिक माहिती आहे. त्यापैकी चौघे जहाजातील पाईप गॅस कटरच्या मदतीने कापण्यासाठी गेले होते. मात्र, पाईप कापण्याचा प्रयत्न सुरू असतानाच जहाजाच्या आतील भागात विषारी वायूची गळती झाल्याचा संशय आहे. या वायूमुळे जहाजाच्या आतील भागात गेलेल्या चौघांचा गुदमरून मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे.
घटनेची माहिती मिळताच गोराई पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. स्थानिक भाजप नगरसेवक शिवानंद शेट्टी यांच्या उपस्थितीत हेलिकॉप्टरच्या मदतीने चौघांचे मृतदेह जहाजातून बाहेर काढण्यात आले. त्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी जवळच्या रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत. मृत चौघांची ओळख पटवण्याचे काम पोलिसांकडून सुरू आहे.
दरम्यान, जहाजापर्यंत चोरटे कसे पोहोचले, चोरीची नेमकी पद्धत काय होती आणि या घटनांमागे कोणती टोळी कार्यरत आहे, याचा तपास गोराई पोलीस करत आहेत. जहाजाच्या मालकाविरोधातही गुन्हा दाखल करण्यात आल्याची प्राथमिक माहिती असून, तो परदेशात फरार असल्याचे सांगितले जात आहे. या जहाजाचा वापर तेलाशी संबंधित बेकायदेशीर व्यवहारांसाठी केला जात असल्याचा दावा करण्यात आला आहे. मात्र, या दाव्याला अद्याप अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.