Burj Khalifa Dubai Tourism : इराण आणि अमेरिका-इस्रायल यांच्यातील युद्धजन्य परिस्थितीमुळे सध्या संपूर्ण आखाती देश चर्चेत आले आहेत. याच दरम्यान हल्ल्यात सापडलेली दुबईतील जगातील सर्वात उंच इमारत म्हणजेच 'बुर्ज खलिफा' (Burj Khalifa) कडे सर्वांचे लक्ष वेधले गेले आहे. 828 मीटर उंचीची ही वास्तू केवळ एक इमारत नसून ती दुबईच्या आधुनिकतेचे आणि यशाचे प्रतीक आहे. 2010 मध्ये सर्वसामान्यांसाठी खुल्या झालेल्या या इमारतीने पर्यटनाचे सर्व विक्रम मोडीत काढले आहेत.
अशी सुचली 'व्हर्टिकल सिटी'ची कल्पना
दुबई सरकारला केवळ खनिज तेलाच्या उत्पन्नावर अवलंबून राहायचे नव्हते. त्यांना जागतिक स्तरावर एक असे केंद्र उभारायचे होते, जे गुंतवणूकदार आणि पर्यटकांना आकर्षित करेल. याच विचारातून एका 'उभ्या शहराची' (Vertical City) संकल्पना जन्माला आली. 2004 मध्ये या इमारतीचे काम सुरू झाले आणि अवघ्या 5 वर्षांत म्हणजेच 2009 मध्ये ही भव्य वास्तू उभी राहिली. 'SOM' कंपनीच्या एड्रीयन स्मिथ आणि बिल बेकर यांनी याचे डिझाइन केले असून, वेगवान वारे आणि हवामानाचा कोणताही परिणाम होऊ नये, अशी याची रचना आहे.
बांधकामातील आश्चर्य आणि खास वैशिष्ट्ये
बुर्ज खलिफाला बाहेरून 26,000 वजनी काचांचे पॅनल लावण्यात आले आहेत. हे काम करण्यासाठी चीनमधून 300 पेक्षा जास्त विशेष कारागीर बोलावले होते. इमारतीचे शिखर 4,000 टन स्टीलपासून बनलेले असून ते आतून फिट करण्यात आले आहे. सुविधेचा विचार केल्यास, येथे दररोज सुमारे 9.4 लाख लिटर पाण्याचा पुरवठा होतो. इमारतीत एकूण 57 लिफ्ट्स आहेत. यातील सर्वात उंच सर्विस लिफ्ट तब्बल 5,000 किलोपर्यंतचे वजन वाहून नेण्यास सक्षम आहे.
हेही वाचा - Indian Rupees Value in Iran : भारताचे 100 रुपये म्हणजे इराणमध्ये लाखो रियाल! युद्धाच्या काळात इराणी चलनाची मोठी घसरण
आत काय आहे आणि कमाई किती?
या इमारतीच्या सुरुवातीच्या मजल्यांवर जगप्रसिद्ध 'अरमानी' हॉटेल आहे, ज्याचे डिझाइन जिओर्जियो अरमानी यांनी केले आहे. वरच्या मजल्यांवर अतिशय महागडी खाजगी अपार्टमेंट्स आणि कॉर्पोरेट ऑफिसेस आहेत. इमारतीच्या 122 व्या मजल्यावर जगातील सर्वात उंच रेस्टॉरंट असून 124, 125 आणि 148 व्या मजल्यांवर 'ऑब्झर्व्हेशन डेक' आहेत, जिथून पूर्ण दुबईचा 360 डिग्री नजारा दिसतो. या इमारतीच्या उभारणीसाठी 1.4 अब्ज डॉलर खर्च आला होता. आज केवळ पर्यटकांच्या तिकीट विक्रीतून ही इमारत दरवर्षी सुमारे 621 दशलक्ष डॉलर (सुमारे 5,154 कोटी रुपये) कमावते.
अबू धाबीच्या शासकांचे नाव
सुरुवातीला या इमारतीचे नाव 'बुर्ज दुबई' असे ठेवण्याचे ठरले होते. मात्र, जागतिक मंदीच्या काळात या प्रकल्पाला अबू धाबीचे शासक खलिफा बिन झायेद अल नाहयान यांनी मोठी आर्थिक मदत केली. त्यांच्या सन्मानार्थ या इमारतीचे नाव 'बुर्ज खलिफा' ठेवण्यात आले. आज या इमारतीतील एका अपार्टमेंटची किंमत कोट्यवधी रुपये असून, यामुळे दुबईच्या रिअल इस्टेट क्षेत्राला अब्जावधी डॉलर्सचा फायदा झाला आहे.
हेही वाचा - Iran Israel Conflict: चार दशकांच्या सत्तेला पूर्णविराम? सर्वोच्च नेते अली खामेनी ठार; वारसदार मोज्तबाचाही मृत्यू, इराणमध्ये सत्तासंकट गडद