Ali Khamenei Death: मध्यपूर्वेत तणावाचा शिखर बिंदू गाठला असताना इराणमधून अत्यंत धक्कादायक बातमी समोर आली आहे. जवळपास चार दशकांपासून देशाची सूत्रे हाती ठेवणारे सर्वोच्च नेते अली खामेनी यांचा अमेरिका आणि इस्रायलने केलेल्या हल्ल्यात मृत्यू झाल्याचा दावा इराणी माध्यमांनी केला आहे. या घटनेमुळे इराणच्या राजकारणात आणि जागतिक पातळीवर मोठी खळबळ उडाली आहे.
इराणच्या अधिकृत सूत्रांच्या माहितीनुसार, राजधानी तेहरानमधील त्यांच्या कार्यालय आणि निवासस्थानावर लक्ष्यित क्षेपणास्त्र हल्ले करण्यात आले. या स्फोटांत खामेनी यांचा मृत्यू झाल्याचे सांगितले जात आहे. अमेरिकेनेही या कारवाईची पुष्टी करत उपग्रह छायाचित्रे जाहीर केल्याचे वृत्त आहे. सरकारी माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, खामेनी अखेरपर्यंत कार्यालयात कार्यरत होते आणि त्याच ठिकाणी त्यांचा अंत झाला.
हेही वाचा:Crude Oil Price Rise: इराण-इस्रायल युद्धामुळे कच्च्या तेलाच्या दरांमध्ये भडका; 10 टक्के वाढीसह किंमत 82 डॉलरवर, भारतात पेट्रोल महागणार?
या हल्ल्यात खामेनी यांच्या कुटुंबातील अनेक सदस्यांचाही मृत्यू झाल्याचा दावा करण्यात येत आहे. विशेष म्हणजे, त्यांचा मुलगा आणि संभाव्य उत्तराधिकारी म्हणून पाहिला जाणारा मोज्तबा खामेनी याचाही मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. मोज्तबा खामेनी हे धार्मिक आणि राजकीय वर्तुळात प्रभावशाली व्यक्तिमत्त्व मानले जात होते. त्यांच्या निधनामुळे सत्तांतराच्या प्रक्रियेवर मोठा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
इराणमध्ये या घटनेनंतर 40 दिवसांचा राष्ट्रीय शोक जाहीर करण्यात आल्याची माहिती आहे. त्यासोबतच काही दिवसांची सार्वजनिक सुट्टीही घोषित करण्यात आली आहे. राजधानीसह अनेक शहरांत सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली असून, संभाव्य अस्थिरतेच्या पार्श्वभूमीवर लष्कर आणि पोलीस दल सतर्क ठेवण्यात आले आहेत.
दरम्यान, हल्ल्यांची मालिका दोन दिवस सुरू राहिल्याचे सांगितले जात आहे. तेहरानमधील महत्त्वाच्या लष्करी आणि प्रशासकीय ठिकाणांनाही लक्ष्य करण्यात आले. काही वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांचाही या कारवाईत मृत्यू झाल्याचा दावा सरकारी वृत्तसंस्थांनी केला आहे. या सर्व घटनांमुळे मध्यपूर्वेतील तणाव आणखी तीव्र होण्याची भीती व्यक्त होत आहे.
हेही वाचा:Donald Trump On War: "आणखी 28 दिवस अन् इराण..." ट्रम्प यांचा सर्वात मोठा आणि भयानक इशारा; तब्बल चार आठवड्यांचा 'डेथ प्लॅन' तयार?
खामेनी यांच्या मृत्यूनंतर इराणमध्ये नेतृत्वाची पुढील दिशा काय असेल, याकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे. संभाव्य उत्तराधिकारी नसल्याने सत्तासंघर्ष निर्माण होण्याची शक्यता तज्ज्ञ व्यक्त करत आहेत. दुसरीकडे, अमेरिका आणि इस्रायलविरुद्ध जनतेत संताप उसळण्याची शक्यता नाकारता येत नाही.
या पार्श्वभूमीवर संयुक्त राष्ट्रांसह अनेक देशांनी संयम बाळगण्याचे आवाहन केले आहे. परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी राजनैतिक प्रयत्न सुरू असल्याचेही सांगितले जात आहे. मात्र, सध्याची घडामोडी पाहता मध्यपूर्वेतील संघर्ष अधिक चिघळण्याची भीती वाढली आहे.इराणच्या राजकारणात आणि आंतरराष्ट्रीय समीकरणांत या घटनेमुळे मोठे बदल घडण्याची शक्यता असून पुढील काही दिवस अत्यंत निर्णायक ठरणार आहेत.