इराण-अमेरिका तणाव दिवसेंदिवस तीव्र होत असताना अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मोठा दावा केला आहे. हा संघर्ष किमान आणखी चार आठवडे सुरू राहू शकतो, असा इशारा त्यांनी दिला आहे. अमेरिकन लष्करी कारवाई “गरज भासेपर्यंत” सुरूच राहील, असेही त्यांनी स्पष्ट केले. इराण हा भौगोलिकदृष्ट्या मोठा आणि लष्करीदृष्ट्या सक्षम देश असल्याने मोहिमेला वेळ लागणार असल्याचे ट्रम्प यांनी नमूद केले.
ब्रिटनमधील एका वृत्तसंस्थेला दिलेल्या दूरध्वनी मुलाखतीत त्यांनी सांगितले की, ही कारवाई सुरुवातीपासूनच निश्चित कालावधी लक्षात घेऊन आखण्यात आली होती. “चार आठवड्यांचा आराखडा आधीपासूनच तयार होता,” असे ते म्हणाले. फ्लोरिडामधील त्यांच्या निवासस्थानी असताना त्यांनी ही भूमिका मांडली. त्यांच्या वक्तव्यामुळे पश्चिम आशियातील तणाव आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, अमेरिका आणि इस्त्रायलने संयुक्तपणे इराणमधील काही महत्त्वाच्या ठिकाणांवर हल्ले केल्याचे वृत्त समोर आले आहे. इराणी माध्यमांच्या दाव्यानुसार, या कारवाईत इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई यांचा मृत्यू झाला आहे. तसेच काही वरिष्ठ अधिकाऱ्यांनाही लक्ष्य करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. या घटनांनंतर इराणने क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ल्यांद्वारे प्रत्युत्तर दिल्याचे वृत्त आहे, ज्यामुळे संपूर्ण प्रदेश अस्थिर झाला आहे.
हेही वाचा: T20 World Cup 2026: गंभीरचा ‘जिगर’ आणि सूर्याचा ‘भरोसा’; गौतम गंभीरचा ‘तो’ एक निर्णय, आणि टीम इंडिया थेट सेमीफायनलमध्ये
ट्रम्प यांनी दावा केला की अमेरिकेची कारवाई नियोजनानुसार पुढे जात आहे आणि इराणच्या नेतृत्वावर मोठा आघात झाला आहे. सुमारे 48 वरिष्ठ नेते ठार झाल्याचा त्यांनी उल्लेख केला, मात्र या आकडेवारीची स्वतंत्र पुष्टी झालेली नाही.
या संघर्षात तीन अमेरिकन सैनिकांचा मृत्यू झाल्याचेही त्यांनी जाहीर केले. मृत सैनिकांची नावे अद्याप जाहीर करण्यात आलेली नसली तरी “ते अत्यंत शूर आणि कर्तव्यदक्ष होते,” असे म्हणत ट्रम्प यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली. युद्धजन्य परिस्थितीत धोके संभवतात, याची जाणीव असल्याचे त्यांनी मान्य केले.
तथापि, ट्रम्प यांनी राजनैतिक मार्ग पूर्णपणे बंद केलेला नसल्याचे संकेत दिले. इराण चर्चेस इच्छुक असल्याचा उल्लेख करत त्यांनी “वेळ महत्त्वाची असते” असे सूचक वक्तव्य केले. तसेच आखाती देशांच्या नेतृत्वाशी संवाद साधल्याची माहितीही त्यांनी दिली. अमेरिकन जनतेला लवकरच संबोधित करण्याची तयारी सुरू असून लष्करी अधिकाऱ्यांसोबत सातत्याने आढावा घेतला जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
सध्याची परिस्थिती पश्चिम आशियातील स्थैर्यासाठी गंभीर आव्हान ठरत आहे. जागतिक ऊर्जा बाजार, शेअर बाजार आणि आंतरराष्ट्रीय राजकारणावर त्याचे परिणाम उमटू लागले आहेत. पुढील काही आठवडे निर्णायक ठरणार असून हा संघर्ष अधिक तीव्र होतो की चर्चेच्या मार्गाने तोडगा निघतो, याकडे जगाचे लक्ष लागले आहे.
हेही वाचा: Ajit Pawar Plane Crash : अक्षम्य चूक! कॉकपीटमधील थरारक व्हिडीओ, पायलटच्या सीटवर VSRचे मालक, लेकाची प्रशासनाकडे आर्त हाक