जळगावमध्ये चाऱ्याचा भीषण तुटवडा! दुष्काळाच्या झळा जनावरांनाही; शेतकऱ्यांसमोर मोठं संकट

दुष्काळी परिस्थितीमुळे राज्यभरातील बळीराजाला शेतीसोबतच उत्पन्नाच्या इतर साधनांवर अवलंबून राहावे लागत आहे.
जळगावमध्ये चाऱ्याचा भीषण तुटवडा! दुष्काळाच्या झळा जनावरांनाही; शेतकऱ्यांसमोर मोठं संकट

दुष्काळी परिस्थितीमुळे राज्यभरातील बळीराजाला शेतीसोबतच उत्पन्नाच्या इतर साधनांवर अवलंबून राहावे लागत आहे, मात्र अशातच एक निराशाजनक बातमी समोर आली आहे.जळगाव जिल्ह्यात पावसाअभावी दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली असून, त्याचा थेट फटका आता शेतकऱ्यांच्या पशुधनाला बसत आहे. त्यामुळे उत्पन्नाचे दुसरे महत्त्वाचे साधन असलेला पशुधन व्यवसायही मोडकळीस आला आहे.पावसाअभावी शेतात पिकं नाहीत, तर दुसरीकडे जनावरांसाठी चाऱ्याची मोठी टंचाई निर्माण झाली आहे. अनेक शेतकऱ्यांकडे केवळ एक महिना पुरेल इतकाच चारा शिल्लक आहे. त्यामुळे यापुढे जनावरं जगवायची कशी, हा गंभीर प्रश्न आता शेतकऱ्यांसमोर उभा आहे.

शेतकरी दुहेरी संकटात-
शेतीवरच पोट असलेल्या शेतकऱ्यांवर वरुणराजा प्रसन्न होत नसल्याने पीक उत्पादन अत्यल्प झाले आहे. त्यामुळे कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा चालवायचा, हा मोठा प्रश्न त्यांच्यासमोर उभा आहे. दुसरीकडे, शेतीच्या कष्टाच्या कामात साथ देणाऱ्या जनावरांना जगवण्याची जबाबदारीही त्यांच्यावरच आहे. त्यामुळे शेतकरी सध्या दुहेरी संकटात सापडला आहे.जनावरांसाठी हिरवा आणि कोरडा चारा मिळणे कठीण झाले असून, आहे तो चारा आणखी किती दिवस पुरेल, याची चिंता आता शेतकऱ्यांना सतावत आहे.

‘जनावरं जगवायची कशी?’ – शेतकऱ्यांसमोर मोठं संकट
सध्या अनेक शेतकरी कुटुंबांसाठी पशुधन हाच उत्पन्नाचा मुख्य आधार आहे. दूध व्यवसायावरच त्यांचा उदरनिर्वाह अवलंबून आहे. पण सध्या जनावरांसाठी चारा मिळेनासा झाल्याने त्यांना जगवायचं तरी कसं, हा मोठा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा राहिला आहे. पोटच्या लेकरांप्रमाणे जपलेल्या जनावरांना केवळ चाऱ्याअभावी विकावे लागू नये, अशी शेतकऱ्यांची इच्छा आहे. मात्र परिस्थिती अशीच राहिली तर नाईलाजाने जनावरे विकण्याची वेळ येईल, अशी हतबलता त्यांनी व्यक्त केली आहे.

हेही वाचा – महाराष्ट्रासाठी दिलासादायक बातमी; दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर फडणवीसांचे अमित शाहांकडे साकडे, आता NDRF कडून…

शेतकऱ्यांच्या नजरा शासनाच्या मदतीकडे
पावसाअभावी शेतीचे नुकसान झालेले असताना आता पशुधन वाचवण्याचे नवे आव्हान समोर आले आहे. जनावरे विकण्याची वेळ येऊ नये आणि शेतकऱ्यांचे पशुधन टिकून रहावे, यासाठी शासनाने तातडीने पावले उचलावीत, अशी मागणी केली जात आहे.

शेतात पीक नाही, हाताला काम नाही आणि जनावरांना चारा नाही अशा तिहेरी कोंडीत बळीराजा सापडला आहे. त्यामुळे शासन चारा टंचाईवर काय उपाययोजना करणार, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version