‘उगाच खोटे आरोप करून निवडणूक लढवू नका’! सोमेश्वर कारखाना निवडणुकीत पवार कुटुंबातील संघर्ष चिघळला; जय पवारांचा युगेंद्र पवारांवर थेट निशाणा

सोमेश्वर साखर कारखाना निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जय पवार यांनी युगेंद्र पवारांच्या आरोपांवर पलटवार केला.

‘उगाच खोटे आरोप करून निवडणूक लढवू नका’! सोमेश्वर कारखाना निवडणुकीत पवार कुटुंबातील संघर्ष चिघळला; जय पवारांचा युगेंद्र पवारांवर थेट निशाणा
Someshwar Sugar Factory

बारामती : सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बारामतीतील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. पवार कुटुंबातील अंतर्गत मतभेद पुन्हा एकदा चर्चेत आले असून राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते जय पवार यांनी युगेंद्र पवार आणि पुरुषोत्तम जगताप यांच्या भूमिकेवर भाष्य केले आहे. निवडणूक लढवण्यास विरोध नसल्याचे स्पष्ट करताना जय पवार यांनी मात्र वस्तुस्थितीच्या आधारावर आरोप करण्याचे आवाहन केले.

‘शेवटपर्यंत वाट पाहिली, पण जगतापांच्या मनात वेगळंच होतं’

सोमेश्वर कारखाना निवडणुकीत एकत्र येण्यासाठी शेवटपर्यंत प्रयत्न सुरू होते, असा दावा जय पवार यांनी केला. मात्र, पुरुषोत्तम जगताप यांच्या मनात वेगळी भूमिका असल्याचे नंतर स्पष्ट झाले, असे त्यांनी सांगितले.

“शेवटच्या दिवसापर्यंत आपण सगळे एकत्र बसून काहीतरी मार्ग काढू, असे मला वाटत होते. मात्र, जगतापांच्या मनात काहीतरी वेगळे होते. दादांचे कुटुंब म्हणजे आपण सगळेच आहोत. तरीही आम्हा सगळ्यांना जगतापांनी डावलले,” अशी भूमिका जय पवार यांनी मांडली.

एकत्र येण्याबाबत चर्चाही झाली होती

काही दिवसांपूर्वी सुप्रिया पवार यांच्या घरी बहिण रेवतीला भेटण्यासाठी गेलो असताना सोमेश्वर कारखाना निवडणुकीबाबत एकत्र येण्याची चर्चा झाली होती, अशी माहिती जय पवार यांनी दिली.

युगेंद्र पवार यांनीच सोमेश्वर कारखान्यासाठी एकत्र येण्याची शक्यता व्यक्त केली होती, असे जय पवार यांनी सांगितले. मात्र, त्यावेळी पार्थ पवार यांनी कार्यकर्त्यांची भूमिका महत्त्वाची असल्याचे स्पष्ट केले. कार्यकर्ते एकत्र येऊ नका, असे सांगत असल्याने त्यांच्या भावनांचा विचार करावा लागेल, अशी भूमिका पार्थ यांनी मांडल्याचे जय पवार यांनी सांगितले.

यानंतरही शेवटपर्यंत दोन्ही बाजूंमध्ये काहीतरी तोडगा निघेल, अशी अपेक्षा असल्याचे जय पवार यांनी स्पष्ट केले.

माळेगाव कारखान्याच्या आरोपांवरूनही पलटवार

माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या आर्थिक स्थितीवरून युगेंद्र पवार यांनी केलेल्या आरोपांवर जय पवार यांनी प्रत्युत्तर दिले. दादांच्या निधनानंतर माळेगाव कारखान्याचे ७० कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा दावा करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

मात्र, आपण या विषयाची माहिती घेतल्यानंतर कारखाना दोन कोटी रुपयांच्या नफ्यात असल्याची माहिती समोर आल्याचे जय पवार यांनी म्हटले. त्यामुळे निवडणूक लढवायची असेल तर नक्की लढवा, मात्र आरोप करताना वस्तुस्थिती समोर ठेवावी, असे आवाहन त्यांनी केले.

“उगाच खोटे आरोप करून निवडणूक लढवू नका. सभासद आणि शेतकरी सुज्ञ आहेत. काय खरं आणि काय खोटं हे त्यांना चांगले समजते. त्यामुळे सत्य फार काळ लपवता येणार नाही,” असा टोला जय पवार यांनी लगावला.

अजितदादांच्या आठवणींना उजाळा

यावेळी जय पवार यांनी दिवंगत अजित पवार यांच्या आठवणींनाही उजाळा दिला. अजित पवार यांच्या अपघाताच्या वेळी त्यांच्याकडे जनतेच्या कामांशी संबंधित कागदपत्रे होती. शेवटच्या क्षणापर्यंत ते जनतेसाठी काम करत होते, असे जय पवार यांनी सांगितले.

अजित पवार यांच्या निधनानंतर राजकारण सोडण्याचा आणि आईला वेळ देण्याचा विचार मनात आला होता. मात्र, त्यानंतरच्या १३ दिवसांत जनतेचे अजित पवारांवरील प्रेम जवळून पाहिले आणि त्यानंतर जनतेसाठी काम करण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले.

‘सभासदांचं हित हाच मुख्य मुद्दा’

सोमेश्वर कारखाना हा सभासद आणि शेतकऱ्यांच्या कष्टातून उभा राहिलेला आहे. त्यामुळे निवडणुकीत वैयक्तिक आरोप-प्रत्यारोपांपेक्षा सभासदांचे हित, शेतकऱ्यांचा फायदा आणि कारखान्याचा विकास यांना प्राधान्य मिळाले पाहिजे, अशी भूमिका जय पवार यांनी मांडली.

ही निवडणूक कोणाच्या वैयक्तिक स्वार्थासाठी नसून कारखान्याचे भविष्य आणि सभासदांच्या हितासाठी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. अखेरचा निर्णय सभासदच घेतील, असेही जय पवार यांनी सांगितले. त्यामुळे सोमेश्वर कारखाना निवडणुकीच्या निमित्ताने पवार कुटुंबातील राजकीय संघर्ष आणखी रंगण्याची चिन्हे आहेत.

Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number