खोपोली : खोपोली शहरातील एका रुग्णालयात एका 8 दिवसांच्या नवजात बालिकेचा मृत्यू झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे. डॉक्टरांनी दिलेल्या औषधामुळे चिमुकल्याचा मृत्यू झाल्याचा गंभीर आरोप नातेवाईकांनी केलेला आहे.
नेमकं घडलं काय?
मिळालेल्या माहितीनुसार, शाहिस्ता मुस्तफा जळगावकर या प्रसूतीनंतर आपल्या बाळाच्या तपणासणीसाठी संबंधित रुग्णालयात गेल्या होत्या. पहिल्यांदा बाळाला कावीळ झाली आहे असे सांगत डॉक्टरांनी काही औषधे दिली. हीच औषधे दिल्यानंतर अवघ्या काही वेळातच बाळाच्या नाकातून रक्त येऊ लागेल आणि तिची प्रकृती अचानक खालावली. त्यानंतर उपचार सुरु असतानाच बाळाचा दुर्दैवी मृत्यू झाला, असे नातेवाईकांचे म्हणणे आहे.
या घटनेनंतर रुग्णालय परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. संतप्त झालेल्या चिमुकल्याच्या नातेवाईकांनी रुग्णालयात गर्दी केल्याने काही वेळ गोंधळ उडाला होता. संपूर्ण प्रकाराची माहिती मिळताच खोपोली पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत सर्व परिस्थिती नियंत्रणात आणली.
अहवालानंतर मृत्यूचं कारण स्पष्ट होणार
दरम्यान, बाळाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी मुंबईच्या जे.जे. रुग्णालयात पाठविला असून,शवविच्छेन अहवाल आल्यानंतरच मृत्यूचे नेमकं कारण काय ते स्पष्ट होईल.या प्रकरणी उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. विशाले नेहुल यांनी माहिती दिली की, दोन्ही बाजूने तक्रारी प्राप्त झालेल्या असून नातेवाईक आणि डॉक्टर यांच्यावर परस्परविरोधी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. पोलीस सध्या या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.