Saturday, March 07, 2026 03:13:27 AM

Kuno Cheetah : चित्त्यांसाठी रोज 35 हजारांचे मांस; वर्षाचा खर्च 1.27 कोटी; तरीही चित्ते गावात का पोहोचतात?

कूनो नॅशनल पार्कमध्ये राहणाऱ्या चित्त्यांना बकरीचे मटण खाऊ घालण्यासाठी दररोज सरासरी 35,000 रुपये खर्च केले जातात. वन्यजीव व्यवस्थापनाच्या (Wildlife Management) निधीतूनच हा खर्च केला जातो.

kuno cheetah  चित्त्यांसाठी रोज 35 हजारांचे मांस वर्षाचा खर्च 127 कोटी तरीही चित्ते गावात का पोहोचतात

Kuno Cheetah Food Cost : मध्य प्रदेशच्या कूनो नॅशनल पार्कमधील चित्त्यांच्या देखभालीवर आणि त्यांच्या आहारावर होणाऱ्या खर्चाबाबत राज्य सरकारने विधानसभेत मोठी माहिती दिली आहे. विजयपूरचे काँग्रेस आमदार मुकेश मल्होत्रा यांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना मुख्यमंत्री मोहन यादव यांनी चित्त्यांची संख्या आणि त्यांच्या जेवणावरील खर्चाचा तपशील सादर केला. या आकडेवारीनुसार, या चित्त्यांना दररोज हजारो रुपयांचे मटण खाऊ घातले जात असून वर्षाकाठी हा खर्च कोट्यवधींच्या घरात जात आहे.

मटणावर 1.27 कोटींचा वार्षिक खर्च
मध्य प्रदेश सरकारने दिलेल्या माहितीनुसार, कूनो नॅशनल पार्कमध्ये राहणाऱ्या चित्त्यांना बकरीचे मटण खाऊ घालण्यासाठी दररोज सरासरी 35,000 रुपये खर्च केले जातात. आर्थिक वर्ष 2024-25 मध्ये केवळ मटण खरेदी करण्यासाठी 1,27,10,870 रुपये खर्च करण्यात आले आहेत. मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले की, चित्त्यांच्या भोजनासाठी स्वतंत्र निधी नसून, वन्यजीव व्यवस्थापनाच्या (Wildlife Management) निधीतूनच हा खर्च केला जातो. दररोज किती बकरे दिले जातील याचे कोणतेही निश्चित मानक नसून, ते पूर्णपणे चित्त्यांची गरज आणि त्यांच्या आरोग्यावर अवलंबून असते.

गावशिवारात चित्त्यांची दहशत
काँग्रेस आमदारांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी मान्य केले की, खुल्या जंगलात वावरणारे चित्ते वारंवार कूनोच्या सीमा ओलांडून बाहेर पडतात. हे चित्ते अनेकदा ग्वाल्हेर, शिवपुरी, मुरैना आणि राजस्थानच्या ग्रामीण भागांत पोहोचतात. या प्रवासादरम्यान चित्ते गावकऱ्यांच्या शेळ्या आणि इतर पाळीव जनावरांची शिकारही करतात. जंगलात पुरेसे भक्ष्य उपलब्ध नसल्यामुळे चित्ते बाहेर पळत असल्याचा आरोप आमदारांनी केला, मात्र सरकारने हा चित्त्यांचा 'नैसर्गिक संचार' असल्याचे सांगत हा दावा फेटाळला.

हेही वाचा - Chandoli : सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात ''सुभेदार'' परतला! ‘चंदा-सेनापती’च्या संसारात तिसऱ्याची ''एन्ट्री''; आता वर्चस्वासाठी सेनापतीशी भिडणार?

महामार्गावरील अपघात आणि कर्मचाऱ्यांना क्लीन चिट
डिसेंबर 2025 मध्ये घाटीगाव हायवेवर रस्ते अपघातात एका चित्त्याचा मृत्यू झाल्याचा मुद्दाही विधानसभेत गाजला. 6 डिसेंबर 2025 रोजी घडलेली ही घटना कर्मचाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे घडली का? असा प्रश्न विचारला असता सरकारने आपल्या अधिकाऱ्यांचा बचाव केला. मुख्यमंत्री म्हणाले की, ट्रॅकिंग टीम प्रभावीपणे काम करत असून महामार्गावरील अपघात ही एक दुर्दैवी घटना होती. यासाठी कोणत्याही अधिकाऱ्याला जबाबदार धरता येणार नाही, असे लेखी उत्तर सरकारने दिले आहे.

सुरक्षेबाबत विरोधकांचे प्रश्न
सरकारने जरी चित्त्यांच्या सुरक्षेसाठी मोठी यंत्रणा राबवली असल्याचा दावा केला असला, तरी विरोधकांनी चित्त्यांच्या मृत्यूबाबत आणि सीमा ओलांडण्याच्या घटनांबाबत चिंता व्यक्त केली आहे. चित्त्यांना सुरक्षित ठेवण्यासाठी आणि त्यांचे मानवाशी होणारे संघर्ष टाळण्यासाठी अधिक प्रभावी उपाययोजना करण्याची मागणी केली जात आहे. कोट्यवधी रुपये खर्च करूनही चित्ते असुरक्षित का आहेत, असा सवाल सध्या विचारला जात आहे.

हेही वाचा - Tadoba Tiger Reserve : ताडोबात उन्हाळ्याची चाहूल! सफारीच्या वेळेत बदल; पर्यटकांना नव्या वेळा नोंदवून घेण्याचे आवाहन


सम्बन्धित सामग्री