राज्यातून मान्सूनने माघार घेतल्यानंतर ऑक्टोबर हीटचे चटके बसत असताना हवामान विभागाने काही जिल्ह्यांसाठी पावसाचा अंदाज वर्तवला आहे. बंगालच्या उपसागरातील बदलती स्थिती आणि दक्षिण भारतात ईशान्य मान्सूनसाठी अनुकूल होत असलेल्या वातावरणामुळे महाराष्ट्रातही पावसासाठी पोषक स्थिती निर्माण होत आहे.
9 जिल्ह्यांत पावसाचा अंदाज
हवामानशास्त्र विभागाच्या अंदाजानुसार, पुणे घाटमाथ्यासह रायगड, पुणे, सातारा, बीड आणि जालना या जिल्ह्यांत हलक्या पावसाचा अंदाज आहे. दक्षिण कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि दक्षिण मराठवाड्यात गुरुवारीपासून काही ठिकाणी हलक्या सरी पडण्याची शक्यता असल्याने उन्हाचा चटका काहीसा कमी होणार आहे.
विभागनिहाय हवामानाचा अंदाज:
कोकण: पालघरमध्ये कोरडे हवामान राहील. मुंबई, ठाणे, रायगडमध्ये उष्ण व दमट हवामान राहील. रत्नागिरी, सिंधुदुर्गमध्ये हलक्या सरींची शक्यता. कमाल 36 डिग्री सेल्सियस, किमान 23 डिग्री सेल्सियस.
उत्तर महाराष्ट्र: धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिकमध्ये कोरडे आणि उष्ण हवामान. कमाल 32 ते 34 डिग्री सेल्सियस, किमान 20 डिग्री सेल्सियस.
पश्चिम महाराष्ट्र: पुणे, सातारा, घाटमाथ्यावर ढगाळ वातावरणासह हलक्या पावसाची शक्यता. अहिल्यानगर, सांगली, सोलापूरमध्ये कोरडे हवामान. कोल्हापूर घाटात हलक्या सरी. कमाल 31 डिग्री सेल्सियस, किमान 21 डिग्री सेल्सियस.
मराठवाडा: छत्रपती संभाजीनगर, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशिवमध्ये कोरडे हवामान. जालना, बीडमध्ये तुरळक सरींची शक्यता. कमाल 35 डिग्री सेल्सियसपेक्षा जास्त, किमान 24 डिग्री सेल्सियस.
विदर्भ: सर्व जिल्ह्यांत उष्ण व कोरडे हवामान, पावसाचा ठोस अंदाज नाही. कमाल 35 ते 36 डिग्री सेल्सियस, किमान 24 डिग्री सेल्सियस.
बंगालच्या उपसागराचा परिणाम
देशातून पुढील 2 दिवसांत नैऋत्य मान्सूनच्या परतीसाठी अनुकूल परिस्थिती आहे. सध्या मान्सूनची परतीची सीमा धुबरी, कोलकाता, अंगुल, खम्मम आणि होनावर येथून जात आहे. दरम्यान, मागील 24 तासांत रत्नागिरी येथे सर्वाधिक 39.2 डिग्री सेल्सियस, तर हरनाई येथे 38.5 डिग्री सेल्सियस तापमानाची नोंद झाली. जळगावमध्ये राज्यातील नीचांकी 7.6 डिग्री सेल्सियस किमान तापमान नोंदवले गेले.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.