सध्या मुंबईकरांना सध्या तीव्र उष्णता, धुरके आणि दूषित हवेचा सामना करावा लागत आहे. अमेरिकेतील ‘IQAir’ या जागतिक पर्यावरण संस्थेने प्रसिद्ध केलेल्या ताज्या अहवालानुसार, जगातील 122 सर्वाधिक प्रदूषित शहरांच्या यादीत मुंबईने एकाच आठवड्यात पाचव्या स्थानावरून थेट तिसऱ्या क्रमांकावर झेप घेतली आहे. शहरात पसरलेल्या धुरक्याच्या दाट थरामुळे मुंबईचे सुंदर दृश्य पूर्णपणे अस्पष्ट झाले असून, सर्वसामान्यांना मोकळा श्वास घेणेही कठीण झाले आहे. डोळ्यांची जळजळ, घशातील संसर्ग आणि श्वसनाचा त्रास यांसारख्या आजारांमध्ये कमालीची वाढ झाली असून नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
वांद्रे-कुर्ला संकुलात हवेची सर्वाधिक वाईट स्थिती
प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या विविध केंद्रांवरील आकडेवारीनुसार, मुंबईतील अनेक प्रमुख भागांमध्ये हवेची गुणवत्ता (AQI) धोकादायक पातळीवर पोहोचली आहे. वांद्रे कुर्ला संकुल (BKC) भागात सर्वाधिक 166 इतका AQI नोंदवला गेला आहे. याशिवाय कुलाबा 154, भांडुप पश्चिम 140, वरळी 140, वांद्रे 139, देवनार 133, गोवंडी 130, अंधेरी चकाला 129, मालाड पश्चिम 123 आणि बोरिवली पूर्व भागात 104 असा हवेचा स्तर नोंदवण्यात आला आहे. उपनगरांपासून ते दक्षिण मुंबईपर्यंत सर्वत्र धुळीचे साम्राज्य निर्माण झाल्यामुळे लहान मुले, वृद्ध आणि दमा असलेल्या रुग्णांना मोठा फटका बसत आहे.
हेही वाचा – भयंकर! वर्क फ्रॉम होमचं आमिष अन् सुरु भलताच खेळ; मुंबईत मोठं रॅकेट उघड
प्रशासनाच्या निष्क्रियतेवर नागरिकांचा संताप
दरवर्षी पावसाळ्यात तुंबणारे पाणी आणि उन्हाळ्यात वाढणारी धूळ यांमुळे मुंबईकर त्रस्त असतात, मात्र प्रदूषण नियंत्रणासाठी ठोस उपाययोजना करण्यात पालिका आणि प्रदूषण नियंत्रण मंडळ अपयशी ठरत असल्याचा आरोप केला जात आहे. वाढत्या बांधकामांमुळे निर्माण होणारी धूळ, वाहनांचा धूर आणि औद्योगिक प्रदूषण यांवर वेळेत नियंत्रण न मिळवल्याने ही परिस्थिती ओढावली आहे. मुंबई महानगरपालिकेने (BMC) आता तरी गांभीर्याने दखल घेऊन अँटी-स्मॉग गन, फॉगिंग आणि प्रत्यक्ष उपाययोजनांची अंमलबजावणी करावी, अशी आक्रमक मागणी पर्यावरणप्रेमी आणि नागरिकांकडून केली जात आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.