एकवीरा देवीच्या दर्शनाला गेले, पण घरी परतलेच नाहीत; दोन दिवसांनंतर बोरघाटात दांपत्याचे…; रायगड हळहळलं

Alibaug Couple Accident News : एकवीरा देवीचे दर्शन घेऊन अलिबागला मोटारसायकलने परतणाऱ्या प्रशांत तांडेल आणि त्यांच्या पत्नीचा बोरघाटात अपघाती मृत्यू झाला. 20 ऑक्टोबरपासून ते बेपत्ता होते. मोबाईल लोकेशनच्या आधारे शोध घेतल्यानंतर खोपोलीतील सायमाळजवळ दोघांचे मृतदेह आढळले. खोपोली पोलीस पुढील तपास करत आहेत.

एकवीरा देवीच्या दर्शनाला गेले, पण घरी परतलेच नाहीत; दोन दिवसांनंतर बोरघाटात दांपत्याचे…; रायगड हळहळलं
Alibaug Couple Accident News

एकविरा देवीचे दर्शन घेऊन पुन्हा अलिबागकडे परतणाऱ्या जोडप्याचा भीषण अपघातात मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडलेली आहे. बोरघाटात ही संपूर्ण दुर्घटना घडली असून दोन दिवसांनी त्यांचे मृतदेह आढळल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

देवदर्शनाचा प्रवास ठरला अखेरचा
मिळालेल्या माहितीनुसार, प्रशांत तांडेल आणि त्यांच्या पत्नी असे मृत दांपत्याचे नाव आहे. ते 20 ऑक्टोबर रोजी कार्ला येथील एकविरा देवीचे दर्शन घेतल्यानंतर पुन्हा आपल्या मोटारसायकलने अलिबागच्या दिशेने निघाले होते. मात्र बराच वेळ झाला तरी घरी पोहोचलेच नाहीत. दोघांशीही संपर्क होत नसल्याने त्यांच्या घरच्यांनी शोधाशोध सुरु केली.

हेही वाचा – भरधाव बस झाडावर धडकली; बस मालकासह 6 प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू, 25 जण गंभीर जखमी

मोबाईलच्या शेवटच्या लोकेशनवरून शोध सुरू
अखेर कुटुंबाने मोबाईलच्या शेवटच्या लोकेशनच्या आधारे त्यांचा शोध सुरु केला. त्या तपासामध्ये खोपोलीतील सायमाळजवळ धनगरवाडीकडे जाणाऱ्या सुनसान मार्गावर त्या दोघांचे मृतदेह आणि त्यांची मोटारसायकल आढळून आली. मोटारसायकल ही रस्त्यावरुन घसरुन खेच खोलवर पडल्याचा अंदाज आहे, त्यामुळे या अपघाताची माहिती त्या मार्गावरुन जाणाऱ्या कोणालाच मिळाली नाही.

या घटनेची माहिती मिळतात तातडीने खोपोली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर हेल्प फाउंडेशनच्या सदस्यांनी तिथं येत मदत केली. सध्या दोघांचे मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठविले आहे. या प्रकरणी खोपोली पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आलेली आहे. पोलीस निरीक्षक सचिन हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे. दर्शनावरून परतताना झालेल्या या दुर्दैवी मृत्यूने तांडेल कुटुंबावर शोककळा पसरली आहे.

 

महाराष्ट्र ते देश-विदेश, ताज्या घडामोडी एका क्लिकवर

महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी | Maharashtra News Live Update

 

Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number