इराण-अमेरिका-इस्रायल संघर्षाच्या पार्श्वभूमीवर मध्य पूर्वेतील तणाव अधिक तीव्र होत असताना इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी मोठे वक्तव्य केले आहे. त्यांनी दावा केला आहे की इराणकडे आता युरेनियम समृद्धीकरण करण्याची किंवा बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे तयार करण्याची क्षमता उरलेली नाही. तसेच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या विनंतीनंतर इस्रायल इराणच्या नैसर्गिक वायू क्षेत्रांवर पुढील हल्ले थांबवेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
नेतन्याहू यांनी इस्रायलच्या लष्करी कारवाईमागील तीन प्रमुख उद्दिष्टेही स्पष्ट केली. त्यांच्या मते, पहिले उद्दिष्ट म्हणजे इराणकडून निर्माण होणारा अणु धोका पूर्णपणे संपवणे, दुसरे म्हणजे बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांचा धोका नष्ट करणे आणि तिसरे म्हणजे इराणी जनतेला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी परिस्थिती निर्माण करणे. त्यांनी सांगितले की इस्रायलने अनेक वर्षांपासून इराणच्या क्षेपणास्त्र कार्यक्रमाबाबत जगाला इशारा दिला होता.
इस्रायली पंतप्रधानांनी इराणवर जागतिक स्तरावर दबाव आणण्याचा प्रयत्न केल्याचा आरोपही केला. त्यांनी म्हटले की इराण स्ट्रेट ऑफ होर्मुज मधील बंद करण्याची धमकी देत जगाला ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र हा प्रयत्न यशस्वी होणार नाही. इस्रायल अमेरिकेसोबत मिळून होर्मुज मार्ग पुन्हा खुला ठेवण्यासाठी गुप्त माहिती आणि इतर माध्यमांतून सहकार्य करत असल्याचे त्यांनी सांगितले.
नेतन्याहू यांनी या संघर्षादरम्यान स्वतःबद्दल पसरत असलेल्या अफवांनाही उत्तर दिले. त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की ते जिवंत आहेत आणि त्याचे साक्षीदार सर्वजण आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या नेतृत्वाखाली अमेरिका आणि इस्रायल इराणविरोधात एकत्रितपणे ठाम आणि शक्तिशाली कारवाई करत असल्याचे त्यांनी नमूद केले. ‘ऑपरेशन रायझिंग लायन’ या मोहिमेचा उद्देश इराणमधील सत्ताधाऱ्यांकडून निर्माण होणारा धोका संपवणे हा असल्याचे त्यांनी सांगितले.
नेतन्याहू यांनी पुढे दावा केला की या संघर्षात इस्रायलला यश मिळत आहे आणि इराणची लष्करी क्षमता मोठ्या प्रमाणात कमकुवत झाली आहे. इराणच्या क्षेपणास्त्र आणि ड्रोन साठ्याला मोठे नुकसान झाले असून त्यातील अनेक ठिकाणे नष्ट करण्यात आली आहेत. तसेच इराणची हवाई संरक्षण व्यवस्था निष्प्रभ झाली असून त्याच्या नौदलालाही मोठा फटका बसल्याचे त्यांनी सांगितले. मात्र अजूनही काही कारवाया बाकी असून त्या पूर्ण केल्या जातील, असेही त्यांनी स्पष्ट केले.