Helicopter Crash 3 Dead: अमेरिकेच्या उत्तर-पश्चिम ओरेगनमधील मॅकमिनविल म्यूनिसिपल एअरपोर्टजवळ एका शेतात काल दुपारी एक अत्यंत भीषण दुर्घटना घडली. हवेतच दोन हेलिकॉप्टर समोरासमोर आल्यामुळे त्यांच्यात जोरदार धडक झाली, ज्यामुळे दोन्ही विमाने तुकडे-तुकडे होऊन धाडकन जमिनीवर कोसळली. या दुर्घटनेत तिघांचा जीव गेला असून, या घटनेनंतर संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या अपघातानंतर सुरक्षेचा उपाय म्हणून नजीकचा हायवे तातडीने बंद करण्यात आला आहे.
अपघातातील बळी आणि घटनास्थळाची माहिती
यमहिल कौंटीचे शरीफ सॅम इलियट यांनी दिलेल्या माहितीनुसार, या अपघातात प्राण गमावलेल्या व्यक्तींमध्ये टेक्सासची फ्लाइट इन्स्ट्रक्चर मॅडी आस्बो, ओरेगन येथील पायलट टायलर स्टर्डिवेंट आणि ब्रिटनच्या एका शिकाऊ पायलसचा समावेश आहे. घटनेच्या तपशिलानुसार, मॅडी आस्बो एका हेलिकॉप्टरमध्ये ब्रिटिश ट्रेनी पायलटसोबत होती, तर दुसऱ्या हेलिकॉप्टरमध्ये टायलर स्टर्डिवेंट एकटेच उड्डाण करत होते. पोर्टलँडपासून सुमारे 40 मैल दक्षिण-पश्चिमेस घडलेल्या या अपघातात लाल रंगाचे हेलिकॉप्टर पूर्णपणे चक्काचूर झाले होते, तर हिरव्या रंगाचे हेलिकॉप्टर उलट्या अवस्थेत पडले होते.
हेही वाचा – भरबाजारात आकाशातून ड्रोन हल्ला! क्षणार्धात मंडईत 100 हून अधिक मृतदेहांचा खच; नेमकं काय घडलं?
प्रत्यक्षदर्शींचे अनुभव आणि प्रशासकीय कारवाई
स्थानिक वेळेनुसार दुपारी 2 वाजता ही दुर्घटना घडली. अपघातग्रस्त परिसराजवळील हायवे 233 चा सुमारे 1 मैलाचा भाग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता. अपघाताबाबत माहिती देताना प्रत्यक्षदर्शी रोड्रिगेज यांनी सांगितले की, ते आपल्या कुटुंबासह जवळच्या द्राक्षांच्या मळ्यात असताना अचानक मोठा आवाज झाला आणि वर पाहिल्यावर दोन्ही हेलिकॉप्टर हवेत एकमेकांना धडकून खाली पडत असल्याचे त्यांनी पाहिले. प्रशासनाने नागरिकांना घटनास्थळाच्या आसपास न जाण्याचे काटेकोर आवाहन केले आहे.
विमान कंपन्यांची प्रतिक्रिया आणि सखोल तपास सुरू
अमेरिकेच्या नॅशनल ट्रान्पोर्टेशन सेफ्टी बोर्ड आणि फेडरल एव्हिएशन अॅडमिनिस्ट्रेशनने या संपूर्ण प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे. प्राथमिक माहितीनुसार, दुर्घटनेतील एक हेलिकॉप्टर प्रशिक्षणासाठी वापरले जाणारे रॉबिन्सन R-22 होते, तर दुसरे देखभालीशी संबंधित उड्डाणासाठी असलेले एअरबस AS350 होते. यातील एक हेलिकॉप्टर जेरी ट्रिम्बल हेलिकॉप्टर्स कंपनीचे असून, कंपनीने या दुर्दैवी घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त करत चौकशीत पूर्ण सहकार्य करण्याचे जाहीर केले आहे. हे दोन्ही हेलिकॉप्टर हवेत नेमके कसे भिडले, याचे नेमके कारण शोधण्याचे काम सध्या सुरू आहे.
हेही वाचा – मोठी बातमी! दोन हाय-स्पीड रेल्वे गाड्यांची जोरदार धडक; अपघातात 46 प्रवाशांचा जागीच मृत्यू