विनापरवानगी गरब्याला गेले, परतताना भीषण अपघात; पालघरमध्ये आश्रमशाळेतील तीन विद्यार्थ्यांचा मृत्यू

पालघरच्या जव्हार तालुक्यातील हिरडपाडा येथे आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांच्या दुचाकीचा भीषण अपघात झाला.

विनापरवानगी गरब्याला गेले, परतताना भीषण अपघात; पालघरमध्ये आश्रमशाळेतील तीन विद्यार्थ्यांचा मृत्यू
Palghar Accident

पालघर जिल्ह्यातील जव्हार तालुक्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. हिरडपाडा येथील एकलव्य/गगनगिरी अनुदानित आश्रमशाळेतील पाच विद्यार्थ्यांच्या दुचाकीचा भीषण अपघात झाला. नवरात्रोत्सवानिमित्त गरबा खेळण्यासाठी गेलेले विद्यार्थी परतत असताना पहाटे साडेतीनच्या सुमारास हा अपघात घडल्याची माहिती आहे. या दुर्घटनेत सुरुवातीला दोन विद्यार्थ्यांचा जागीच मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले, तर अन्य तीन विद्यार्थी गंभीर जखमी झाले. मिळालेल्या माहितीनुसार, अपघातातील जखमी विद्यार्थ्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यापैकी तिघांना नाशिक सिव्हिल हॉस्पिटलमध्ये नेण्यात आल्याची माहिती आहे. जखमींपैकी एका विद्यार्थ्याची प्रकृती अत्यंत गंभीर होती. त्याचाही मृत्यू झाल्याचे वृत्त सूत्रांकडून समोर आले आहे. मात्र, या वृत्ताला अधिकृत दुजोरा मिळणे अद्याप बाकी आहे.

या दुर्घटनेत मृत्यू झालेल्या विद्यार्थ्यांची नावे सुमित गिम्बल (वय 18 वर्षे) आणि प्रीतम पोतींदा (वय 15 वर्षे) अशी सांगण्यात आली आहेत. इतर विद्यार्थ्यांमध्ये सुमित भोरे (वय 16 वर्षे), रुस्तम पोतींदा (वय 10 वर्षे) आणि सुजित पोतींदा (वय 18 वर्षे) यांचा समावेश असल्याची माहिती आहे. या भीषण अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. अपघात नेमका कसा घडला, याबाबत अधिकृत माहिती आणि पोलिसांकडून तपशील समोर येणे बाकी आहे.

Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number