कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाच्या झपाट्याने होत असलेल्या प्रगतीमुळे इंटरनेट वापरण्याची पद्धत मोठ्या प्रमाणात बदलत आहे. आता वेब ब्राउझिंगसाठी स्क्रीनला स्पर्श करण्याचीही आवश्यकता उरणार नसल्याचे चित्र निर्माण झाले आहे. एआय क्षेत्रातील आघाडीची कंपनी परप्लेक्सिटीने ‘कॉमेट’ या एआय ब्राउजरमध्ये प्रगत व्हॉइस मोड अपडेट सादर करत ब्राउझिंग अनुभव अधिक स्मार्ट आणि सुलभ करण्याचा प्रयत्न केला आहे.
या नव्या सुविधेमुळे वापरकर्त्यांना पूर्णपणे हँड्स-फ्री ब्राउझिंगचा अनुभव मिळणार आहे. कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी अरविंद श्रीनिवास यांनी दिलेल्या माहितीनुसार, वापरकर्ते आता केवळ आवाजाच्या माध्यमातून ब्राउजरचे संपूर्ण नियंत्रण करू शकतील. व्हॉइस कमांडद्वारे सर्च करणे, संकेतस्थळ उघडणे, वेब कंटेंटशी संवाद साधणे तसेच विविध ऑनलाइन कामे सहज पूर्ण करता येणार आहेत. टॅब बदलणे, पेज स्क्रोल करणे किंवा नवीन वेबसाईट सुरू करण्यासाठी हात वापरण्याची गरज राहणार नाही.
हेही वाचा: T20 World Cup Super8: टीम इंडिया विरुद्ध झिंबाब्वे निर्णायक सामना नक्की किती वाजता? जाणून घ्या चॅनेल आणि स्ट्रीमिंगचे सर्व डिटेल्स
कंपनीच्या माहितीनुसार, हे फीचर ओपनएआयच्या रिअल-टाइम मॉडेलवर आधारित विकसित करण्यात आले आहे. त्यामुळे ब्राउझिंग अधिक नैसर्गिक, जलद आणि संवादात्मक होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. तंत्रज्ञान तज्ज्ञांच्या मते, भविष्यात डिजिटल उपकरणांशी संवाद साधण्याची पद्धत या तंत्रज्ञानामुळे पूर्णपणे बदलू शकते.
कॉमेट ब्राउजरमधील सुधारित व्हॉइस मोड सुविधा लवकरच आयओएस प्लॅटफॉर्मवर उपलब्ध होणार असल्याची माहिती कंपनीकडून देण्यात आली आहे. मात्र ही सुविधा आयफोन आणि डेस्कटॉप आवृत्तीत एकाच वेळी उपलब्ध होईल की टप्प्याटप्प्याने सादर केली जाईल, याबाबत अद्याप अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.
दरम्यान, एआयच्या वाढत्या प्रभावामुळे पारंपरिक सर्च इंजिन वापराची संकल्पना बदलताना दिसत आहे. एआय आधारित ब्राउजर आणि सर्च प्रणालींमुळे वापरकर्त्यांना आवश्यक माहिती थेट संवादात्मक स्वरूपात मिळू लागली आहे. गुगलसारख्या तंत्रज्ञान क्षेत्रातील मोठ्या कंपन्याही एआय सर्चवर भर देत असून ब्राउजरमध्ये एआय आधारित सुविधा सातत्याने वाढवण्यात येत आहेत. सर्च परिणामांमध्ये थेट एआय सारांश उपलब्ध होत असल्याने माहिती मिळवण्यासाठी वेगवेगळ्या संकेतस्थळांना भेट देण्याची गरज कमी होत असल्याचे स्पष्ट होत आहे.
हेही वाचा: Belasis Bridge Opening: दक्षिण मुंबईचा 'लाईफलाईन' रस्ता पुन्हा सक्रिय; 130 वर्षांचा वारसा लाभलेला बेलासिस पूल प्रवाशांच्या सेवेत