PM Modi Meets Keir Starmer: पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ब्रिटनचे पंतप्रधान केयर स्टार्मर यांची गुरुवारी मुंबईत उच्चस्तरीय बैठक झाली. दोन्ही नेत्यांनी भारत-यूके व्हिजन 2035 या दीर्घकालीन रोडमॅपअंतर्गत दोन्ही देशांतील व्यापक धोरणात्मक भागीदारी अधिक दृढ करण्यावर चर्चा केली. या चर्चेत व्यापार, गुंतवणूक, तंत्रज्ञान, संरक्षण, हवामान बदल आणि शिक्षण या क्षेत्रांतील सहकार्य वाढवण्यावर विशेष भर देण्यात आला. दोन्ही नेते यानंतर मुंबईत सुरू असलेल्या सीईओ फोरम आणि ग्लोबल फिनटेक फेस्ट 2025 मध्येही सहभागी होणार आहेत, जिथे उद्योगजगत आणि धोरणकर्त्यांशी थेट संवाद साधला जाणार आहे.
भारत-यूके सहकार्याचा नवा अध्याय
जुलै महिन्यात झालेल्या भारत-यूके मुक्त व्यापार करारानंतर (FTA) स्टारमर यांचा हा पहिला अधिकृत भारत दौरा आहे. त्यांच्यासोबत आलेले 125 सदस्यांचे यूके व्यापार प्रतिनिधी मंडळ हे ब्रिटनकडून भारतात आलेले आतापर्यंतचे सर्वात मोठे प्रतिनिधी मंडळ मानले जात आहे. या गटात अनेक नामांकित व्यावसायिक नेते, उद्योजक आणि विद्यापीठांचे कुलगुरू सहभागी आहेत.
मोदींचं स्वागत आणि स्टारमर यांची भूमिका
पंतप्रधान मोदींनी स्टार्मर यांच्या भेटीला ऐतिहासिक अशी प्रतिक्रिया दिली. ट्विटरवर पोस्ट करत मोदी म्हणाले, युकेमधील आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या व्यापारी प्रतिनिधी मंडळासह भारताच्या तुमच्या ऐतिहासिक पहिल्या भेटीत पंतप्रधान केयर स्टारमर यांचे स्वागत आहे. दोन्ही देशांच्या प्रगतीसाठी उद्याच्या आमच्या भेटीची मी उत्सुकता बाळगतो. बुधवारी मुंबईत आगमनानंतर स्टारमर यांनी दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर दिवे पेटवून भारत-यूकेच्या सांस्कृतिक मैत्रीचे प्रतीक व्यक्त केले.
हेही वाचा - Gaza Israel war Update : ऐतिहासिक क्षण: इस्त्राइल-हमास शांतता योजनेच्या पहिल्या टप्प्याला सहमती; ट्रम्प यांची घोषणा
व्हिजन 2035 रोडमॅपचा आढावा
दोन्ही देशांच्या नेत्यांनी व्हिजन 2035 या धोरणात्मक आराखड्यातील प्रगतीचा आढावा घेतला. या अंतर्गत व्यापार, तंत्रज्ञान आणि नवोपक्रम, संरक्षण आणि सुरक्षा, हवामान व ऊर्जा, आरोग्य, शिक्षण आणि लोक-ते-लोक संबंध अधिक मजबूत करण्यावर भर देण्यात येणार आहे.
हेही वाचा - Fox Eyes Surgery : शस्त्रक्रियेतील गुंतागुंतीनंतर ब्राझीलियन इन्फ्लुएन्सरचा मृत्यू; डॉक्टरवर आधीच केला होता खटला दाखल
मुक्त व्यापार कराराचा लाभ
जुलै 2024 मध्ये स्वाक्षरी झालेला भारत-यूके मुक्त व्यापार करार हा दोन्ही देशांमधील वार्षिक व्यापार 25.5 अब्ज पौंडांनी वाढवण्यासाठी तयार करण्यात आला आहे. ब्रिटिश उच्चायुक्तालयाने दिलेल्या माहितीनुसार, स्टारमर यांनी जाहीर केलं की 2026 पासून यश राज फिल्म्स (YRF) च्या तीन मोठ्या निर्मितींचे चित्रीकरण युनायटेड किंग्डममधील विविध ठिकाणी केले जाईल. या भेटीला भारत-यूके संबंधांच्या इतिहासातील एक नवा टप्पा मानला जात आहे. दोन्ही नेत्यांच्या चर्चेमुळे व्यापार, तंत्रज्ञान आणि संस्कृतीच्या माध्यमातून दोन देशांमधील नाती आणखी दृढ होतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.