Monday, November 10, 2025 01:12:47 PM

Fox Eyes Surgery : शस्त्रक्रियेतील गुंतागुंतीनंतर ब्राझीलियन इन्फ्लुएन्सरचा मृत्यू; डॉक्टरवर आधीच केला होता खटला दाखल

'जूनियर दुत्रा' या नावाने प्रसिद्ध इन्फ्लुएन्सरने मार्चमध्ये सेलिब्रिटी सर्जन फर्नांडो गार्बी यांच्याकडून ही शस्त्रक्रिया करून घेतली होती. मृत्यूपूर्वी ज्युनियरने या डॉक्टरांवर आरोप केले होते.

fox eyes surgery  शस्त्रक्रियेतील गुंतागुंतीनंतर ब्राझीलियन इन्फ्लुएन्सरचा मृत्यू डॉक्टरवर आधीच केला होता खटला दाखल

Fox Eyes Surgery : ब्राझीलियन फॅशन इन्फ्लुएन्सर अडेअर मेंडेस दुत्रा ज्युनियर (Adair Mendes Dutra Junior ) याचा 'Fox Eyes' (फॉक्स आइज) शस्त्रक्रियेतील गंभीर गुंतागुंत आणि संसर्गाच्या तक्रारीनंतर 3 ऑक्टोबर रोजी मृत्यू झाला. तो 31 वर्षांचा होता, अशी माहिती एका मासिकाने दिली आहे. 'फॉक्स आइज' शस्त्रक्रिया ही एक कॉस्मेटिक प्रक्रिया आहे, ज्यात डोळ्यांचे बाहेरील कोपरे उचलून आणि लांबवून त्यांना विदेशी मांजरीसारखा (Cat-like) आकर्षक लूक दिला जातो.

शस्त्रक्रियेनंतर (Surgery) संसर्गाची तक्रार
'जूनियर दुत्रा' या नावाने प्रसिद्ध असलेल्या या इन्फ्लुएन्सरने मार्च महिन्यात सेलिब्रिटी सर्जन फर्नांडो गार्बी यांच्याकडून ही शस्त्रक्रिया करून घेतली होती. एका मुलाखतीदरम्यान, ज्युनियरने दावा केला होता की, शस्त्रक्रियेनंतर त्याच्या चेहऱ्यावर गंभीर संसर्ग (Complications) झाला. यात सूज, जखमा आणि श्वास घेण्यास त्रास (Shortness of breath) यांसारखी लक्षणे त्याला जाणवत होती. त्याचे मित्र जीन सूझा (Gean Souza) यांनी ब्राझीलियन मासिकाला सांगितले की, संसर्ग झाल्यानंतर ज्युनियरची तब्येत बिघडली, त्याला श्वास घेण्यास खूप त्रास झाला आणि 3 ऑक्टोबर रोजी त्याला तातडीने जवळच्या सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले, जिथे त्याचा मृत्यू झाला.

हेही वाचा - Jhund Actor Death: नागपूर हादरलं! ‘झुंड’ चित्रपटातील अभिनेता प्रियांशू उर्फ बाबू छेत्री याचा निर्घृण खून

डॉक्टरवर दाखल केला होता खटला
ब्राझीलियन वृत्तसंस्था पोर्टल लिओ डायसने (Portal Leo Dias) प्राप्त केलेल्या कायदेशीर दस्तऐवजांनुसार, मृत्यू होण्यापूर्वी ज्युनियरने सर्जन फर्नांडो गार्बी यांच्यावर गुन्हा दाखल केला होता. ज्युनियरने अवैध वैद्यकीय प्रॅक्टीस (Illegal Medical Practice), फसवणूक (Fraud) आणि गंभीर शारीरिक हानी (Serious Bodily Harm) अशा सहा आरोपांखाली गार्बीवर खटला दाखल केला होता, तसेच त्यांच्या चौकशीची विनंतीही केली होती.

डॉक्टरांनी आरोपांचे केले खंडन
दरम्यान, डॉक्टर फर्नांडो गार्बी यांच्या वकिलांनी इंस्टाग्रामवर (Instagram) एक स्टेटमेंट (Statement) जारी केले आहे. या पोर्तुगीज भाषेतील निवेदनात वकिलांनी ज्युनियरच्या मृत्यूशी गार्बी यांचा कोणताही 'संबंध' असल्याचा दावा फेटाळून लावला आहे. 'प्रसिद्धीसाठी उत्सुक असलेल्या लोकांनी हे खोटे दावे केले आहेत,' असे त्यांनी लिहिले आहे. 'या अपमानास्पद आणि बदनामीकारक विधाने करणाऱ्यांवर दिवाणी आणि फौजदारी दोन्ही स्तरांवर कायदेशीर कारवाई (Legal Measures) केली जाईल,' असेही वकिलांनी स्पष्ट केले आहे.

फॉक्स आईज सर्जरी (Fox Eyes Surgery) म्हणजे काय?
फॉक्स आईज सर्जरी, ज्याला कँथोपलेस्टी (Canthoplasty) किंवा टेम्पोरल ब्रो लिफ्ट (Temporal Brow Lift) असेही म्हणतात, ही एक कॉस्मेटिक प्रक्रिया (Cosmetic Procedure) आहे. या शस्त्रक्रियेचा मुख्य उद्देश डोळ्यांच्या बाहेरील कोपऱ्यांना वरच्या दिशेने उचलणे (Lift) आणि किंचित लांब करणे हा असतो. या प्रक्रियेमुळे व्यक्तीला अधिक आकर्षक, लांबट आणि 'विदेशी मांजरीसारखा' (Cat-like) किंवा 'फॉक्ससारखा' (Fox-like) तिरकस लूक मिळतो. ही शस्त्रक्रिया अनेकदा भुवयांचा शेवटचा भागही वर उचलण्यासाठी केली जाते आणि विशेषत: तरुण पिढीमध्ये हा लूक मिळवण्यासाठी ती लोकप्रिय झाली आहे.

हेही वाचा - Fraud Case: शिल्पा शेट्टीला न्यायालयाकडून झटका! देश सोडून जाण्याची परवानगी नाकारली


सम्बन्धित सामग्री