Pune Ganesh Visarjan DJ: राज्यात ध्वनिप्रदूषणाच्या नियमांनुसार डीजेवर पूर्णपणे बंदी घालण्यात आलेली नसून, सणासुदीच्या काळात नियम आणि निर्धारित ध्वनीमर्यादांचे पालन करून ध्वनिवर्धकांचा वापर करण्यास परवानगी देण्यात आली होती. पुणे पोलिसांनीही विसर्जन मिरवणुकीदरम्यान ध्वनीपातळीवर लक्ष ठेवण्यासाठी 120 ठिकाणी निरीक्षणाची व्यवस्था केली होती. मात्र, काही ठिकाणी नियमांचे उल्लंघन झाल्याचे समोर आले.
नेमके काय घडले?
पुण्यातील अलका चौकात डीजे बंद करण्याच्या पोलिसांच्या सूचनांवरून एका गणेश मंडळाच्या पदाधिकाऱ्याची पोलिसांशी हुज्जत झाल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. शुक्रवारी अनंत चतुर्दशीला पुण्यातील गणेश विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली. लक्ष्मी रस्ता, कुमठेकर रस्ता, टिळक रस्ता आणि केळकर रस्त्यावरून मिरवणुका अलका चौकात येत होत्या. याचदरम्यान एका मंडळाने मोठ्या स्पीकरसह अलका चौकात प्रवेश केला. पोलिसांनी स्पीकर बंद करण्यास सांगितल्यानंतर मंडळाच्या पदाधिकाऱ्याने माईकवरून ‘आमचा स्पीकर बंद करताय तर आधी सगळ्यांचे स्पीकर बंद करा’ अशी भूमिका घेतल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे.
यानंतर मंडळाकडून DJ सुरू ठेवण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे. व्हिडिओमध्ये वरिष्ठ पोलीस अधिकारी हा प्रकार पाहताना दिसत असून, एका पोलिस अधिकाऱ्याने मोठ्या आवाजापासून बचावासाठी कानावर साऊंडप्रूफ हेडफोन लावल्याचेही दिसते.
Vidyanand Bapat: DJ लावल्यास 15 लाखांचा दंड आणि 5 वर्षांची शिक्षा? विद्यानंद बापट यांची आक्रमक मागणी
115.4 डेसिबलपर्यंत आवाजाची नोंद
यंदाच्या पुणे गणेश विसर्जन मिरवणुकीत ध्वनिप्रदूषणाची पातळी मोठ्या प्रमाणात वाढल्याचे COEP टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटीच्या निरीक्षणातून समोर आले आहे. लक्ष्मी रस्त्यावरील 10 प्रमुख चौकांमध्ये करण्यात आलेल्या निरीक्षणानुसार, यंदाची सरासरी ध्वनीपातळी 104.5 डेसिबल नोंदवण्यात आली. 2025 मधील 92.6 डेसिबलच्या तुलनेत ही पातळी 11.9 डेसिबलने वाढली.
दुपारी 4 वाजता सरासरी 113.4 डेसिबल, रात्री 8 वाजता 111.9 डेसिबल, तर मध्यरात्री 12 वाजता 112.6 डेसिबल आवाजाची नोंद झाली.
विसर्जन मिरवणूक रात्री उशिरापर्यंत सुरू राहिल्याने ध्वनिप्रदूषणाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. नियमांची अंमलबजावणी आणि प्रत्यक्ष मिरवणुकीतील ध्वनीपातळी यामध्ये मोठी तफावत असल्याचे या आकडेवारीवरून दिसून येते.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.