महाराष्ट्राच्या राजकारणात ठाकरे कुटुंब आणि संजय राऊत यांचे संबंध नेहमीच चर्चेत असतात. आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी संजय राऊत आणि शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्यातील जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे. सुरुवातीला संजय राऊत यांचे नाव ऐकताच बाळासाहेब नाराज व्हायचे. मात्र, एका मुलाखतीनंतर त्यांच्याबद्दलचे मत बदलले आणि त्यांनी राऊत यांचे कौतुकही केले. ‘बोध कीर्तन’ या संजय राऊत यांच्या पुस्तक प्रकाशन सोहळ्यात राज ठाकरेंनी हा रंजक किस्सा सांगितला.
संजय राऊतांचे नाव ऐकताच बाळासाहेब चिडायचे!
राज ठाकरे यांनी सांगितले की, संजय राऊत आणि त्यांचे संबंध खूप जुने आहेत. १९८६-८७ च्या काळात राज ठाकरे ‘लोकसत्ता’मध्ये फ्रीलान्स व्यंगचित्रकार म्हणून काम करत होते. त्यावेळी संजय राऊत ‘लोकप्रभा’मध्ये कार्यरत होते. मुंबईतील गँगवॉरवर राऊत यांनी लिहिलेल्या बातम्यांची त्यावेळी चांगली चर्चा होती. मात्र, संजय राऊत शिवसेनेवर टीका करणारे लेखही लिहायचे. त्यामुळे बाळासाहेब ठाकरे त्यांच्यावर नाराज होते. राऊत यांना बाळासाहेबांची मुलाखत घ्यायची होती. त्यासाठी त्यांनी राज ठाकरेंकडे मदत मागितली. राज यांनी बाळासाहेबांकडे दोन-तीन वेळा आग्रह केला. मात्र, सुरुवातीला त्यांनी मुलाखत देण्यास नकार दिला.
मुलाखतीतील शिव्याही राऊतांनी जशाच्या तशा छापल्या
अखेर बाळासाहेबांनी मुलाखतीला होकार दिला. मात्र, मुलाखतीदरम्यान संजय राऊत यांनी काही थेट आणि अवघड प्रश्न विचारले. त्यामुळे बाळासाहेबांनी त्यांना सुनावले. विशेष म्हणजे, दुसऱ्या दिवशी मुलाखत प्रसिद्ध करताना राऊत यांनी बाळासाहेबांनी दिलेल्या शिव्याही गाळल्या नाहीत. हे पाहून बाळासाहेब प्रभावित झाले. त्यावेळी त्यांनी राऊत यांच्याबद्दल ‘इस बंदे में दम है’ अशी प्रतिक्रिया दिल्याचे राज ठाकरेंनी सांगितले.
अशा प्रकारे मिळाली ‘सामना’च्या संपादकपदाची जबाबदारी
राज ठाकरे यांच्या म्हणण्यानुसार, पुढे १९९२ मध्ये त्यांनी बाळासाहेबांना संजय राऊत चांगले लिहितात, असे सांगितले. त्यानंतर राऊत यांची दैनिक ‘सामना’च्या संपादकपदी नियुक्ती झाली.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.