भारताचा हिटमॅन मनोरंजन क्षेत्रात देखील शतकी खेळी करतोय. क्रिकेटविश्व गाजवत असतानाच छोट्या पडद्यावर देखील रोहित आपल्या निखळ व मजेशीर व्यक्तिमत्त्वामुळे चाहत्यांचे मन जिंकत आहे. त्याने मनोरंजन विश्वात आपली एक वेगळी जागा निर्माण केली आहे. श्रेयस अय्यर, चहल यांच्यासोबत मस्ती करतानाचे व्हिडिओज व सोशल मीडियावरील रील्स अनेकदा चांगलेच व्हायरल होत असतात, तसेच चाहते त्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद देत असतात.
अशातच रोहितचा ‘फॅमिली फुल हाऊस विथ रोहित शर्मा’ हा शो चांगलाच गाजताना दिसत आहे. या शोच्या माध्यमातून रोहित पहिल्यांदाच होस्टच्या भूमिकेत पाहायला मिळाला. ‘फॅमिली फुल हाऊस विथ रोहित शर्मा’ शो 19 सप्टेंबर पासून सुरू झालेला आहे. तर या शोमध्ये रोहितचा अनोखा अंदाज प्रेक्षकांना पाहायला मिळाला. हा शो म्हणजे क्रिकेट चाहत्यांची चांगलीच मेजवानी होय.
नुकत्याच झालेल्या एका एपिसोडमध्ये प्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेते जॅकी श्रॉफ, अभिनेत्री नेहा धुपिया आणि तिचा पती अंगद बेदी यांनी हजेरी लावली होती. तर या एपिसोड दरम्यान रोहितच्या क्रिकेट कारकीर्दीतील सुरुवातीच्या दिवसांशी संबंधित खास किस्सा समोर आला. अभिनेत्रीने नेहा धुपियाचा पती अंगद बेदीने रोहितला त्याच्या पहिल्या कमाईबाबत प्रश्न विचारला. यावर रोहितने असं काही उत्तर दिलं की ते ऐकून प्रेक्षकांच्या डोळ्यात पाणी आलं.
रोहितने दिलेले उत्तर –
पहिल्या कमाईतून काय विकत घेतलं? असा प्रश्न केला असता रोहितने ‘फोन’ असे उत्तर दिले आणि त्यामागची एक भावुक गोष्ट सांगितली. रोहितच्या संघर्षाच्या काळात त्याच्याकडे जेवायला देखील पैसे नसायचे. तेव्हा त्याने थोडे-थोडे पैसे जमवून एक फोन विकत घेतला होता. कारण त्याला त्याच्या कुटुंबाशी संपर्कात राहायचे होते. मैदानातील प्रत्येक खेळाडूकडे फोन होता आणि ते त्यांच्या कुटुंबीयांशी बोलायचे, मात्र रोहितकडे फोन नसल्यामुळे त्याला एकटेपणा आणि अंतर जाणवायचे. त्यामुळे कुटुंबासोबतची जवळीक टिकून राहावी आणि त्यांच्याशी बोलता यावे म्हणून रोहितने त्याच्या पहिल्या कमाईतून फोन विकत घेतला होता.
ही हृदयस्पर्शी गोष्ट ऐकून अनेक चाहत्यांचेही डोळे पाणावले, तर रोहितला देखील त्याच्या संघर्षाचा काळ आठवून राहवले नाही, त्याच्या डोळ्यात अश्रू तरळले.
विशेष म्हणजे, पहिला मोठा चेक हातात आल्यावर रोहितने स्वतःसाठी काहीही न घेता संपूर्ण रक्कम कुटुंबाला दिली होती. त्याच्या या किस्स्यातून त्याचा साधेपणा, क्रिकेटमधील सुरुवातीच्या काळातला संघर्ष आणि कुटुंबाबद्दल असलेले प्रेम दिसून येते. सध्या रोहितचा हा भावनिक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून, चाहत्यांकडून त्याचे खूप कौतुक होत आहे.