छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यात एसटी बसचा भीषण अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. छत्रपती संभाजीनगरहून जळगावच्या दिशेने जाणाऱ्या एसटी बसने पोकलेन घेऊन जाणाऱ्या ट्रेलरला पाठीमागून जोरदार धडक दिली. या अपघातात बसमधील 29 प्रवासी जखमी झाले असून, त्यापैकी 8 जण गंभीर जखमी असल्याची माहिती आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सिल्लोड तालुक्यातील मुखपाठ फाट्याजवळ हा अपघात झाला. एसटी बसचे ब्रेक निकामी झाल्याने चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले आणि बसने पुढे असलेल्या ट्रेलरला जोरदार धडक दिल्याचे सांगण्यात येत आहे. ट्रेलरवर पोकलेन मशीन नेण्यात येत होते.
धडक इतकी जोरदार होती की, ट्रेलरवरील पोकलेनचा काही भाग बसच्या काचा फोडून थेट बसमध्ये घुसला. त्यामुळे बसमधील प्रवाशांमध्ये मोठी घबराट निर्माण झाली. अपघातानंतर बसमध्ये अडकलेल्या आणि जखमी झालेल्या प्रवाशांना बाहेर काढण्यासाठी स्थानिक ग्रामस्थांनी तातडीने मदत केली.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनीही घटनास्थळी धाव घेतली. जखमी प्रवाशांना तातडीने सिल्लोड ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. यामध्ये ८ प्रवाशांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथे हलवण्यात आले आहे. इतर जखमींवर सिल्लोड येथे उपचार सुरू असल्याची माहिती आहे.
या अपघातामुळे या मार्गावरील वाहतुकीवरही मोठा परिणाम झाला. अपघातग्रस्त वाहने रस्त्यावर असल्याने रस्त्याच्या दोन्ही बाजूंना वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. तब्बल दोन तास वाहतूक ठप्प झाली होती. त्यामुळे प्रवाशांना आणि वाहनचालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला.
दरम्यान, अजिंठा पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून परिस्थिती नियंत्रणात आणली आणि वाहतूक सुरळीत केली. अपघात नेमका कशामुळे झाला, बसचे ब्रेक कशामुळे निकामी झाले आणि या घटनेला इतर कोणते कारण कारणीभूत आहे का, याचा तपास पोलिसांकडून केला जात आहे. जखमी प्रवाशांची प्रकृती आणि अपघाताचा पुढील तपशील उपचार व पोलिसांच्या तपासानंतर स्पष्ट होणार आहे.