Tuesday, June 09, 2026 01:57:27 PM

Stock Market Today: शेअर बाजारात 'महाब्लास्ट'; निवडणुकीच्या निकालांनंतर गुंतवणूकदारांची 5.4 लाख कोटींची कमाई; सेन्सेक्स 900 अंकांनी वधारला

निवडणुकीच्या सुरुवातीच्या कलांमुळे भारतीय शेअर बाजारात जोरदार तेजी पाहायला मिळाली. सेन्सेक्स आणि निफ्टी मोठ्या प्रमाणात वधारले असून गुंतवणूकदारांना मोठा फायदा झाला आहे.

stock market today शेअर बाजारात महाब्लास्ट निवडणुकीच्या निकालांनंतर गुंतवणूकदारांची 54 लाख कोटींची कमाई सेन्सेक्स 900 अंकांनी वधारला

मुंबई: "राजकारणाची दिशा आणि शेअर बाजाराची दशा" आज पुन्हा एकदा एकमेकांच्या हातात हात घालून चालताना दिसत आहेत. देशातील पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचे सुरुवातीचे कल समोर येताच, भारतीय शेअर बाजाराने आज सोमवारी (4 मे 2026) रोजी ऐतिहासिक उसळी घेतली आहे. तामिळनाडू, केरळ आणि विशेषतः बंगालमधील सत्तांतराचे संकेत आणि आसाममध्ये भाजपचे पुनरागमन यामुळे गुंतवणूकदारांमध्ये कमालीचा उत्साह दिसून येत आहे. या सकारात्मक वातावरणाचे प्रतिबिंब थेट निर्देशांकांवर उमटले असून, अवघ्या काही तासांत गुंतवणूकदारांनी 5.4 लाख कोटी रुपयांहून अधिक माया कमावली आहे.

निवडणुकीच्या निकालांचा सेन्सेक्सवर 'करिश्मा'

सकाळी 10 वाजून 35 मिनिटांनी सेन्सेक्स 600 हून अधिक अंकांच्या तेजीसह 77,520.78 वर व्यवहार करत होता. मात्र, व्यवहार सत्रादरम्यान त्याने 997.25 अंकांची मोठी झेप घेत 77,910.75 चा उच्चांकी टप्पा गाठला. दुसरीकडे, नॅशनल स्टॉक एक्सचेंजचा निफ्टी (Nifty) देखील 300 अंकांनी वधारून 24,290.20 अंकांवर पोहोचला होता. बंगालच्या निवडणुकीत भाजपने बहुमताचा आकडा पार केल्याचे सुरुवातीचे चित्र पाहून बाजाराने दिलेली ही प्रतिक्रिया अत्यंत बोलकी आहे.

या शेअर्समध्ये सर्वाधिक 'फायर' ब्रँड तेजी

आजच्या बाजारातील तेजीचे सारथ्य ऑटो आणि एफएमसीजी (FMCG) क्षेत्रातील शेअर्सनी केले. हिंदुस्थान युनिलिव्हर (HUL) आणि मारुती सुझुकी यांच्या शेअर्समध्ये 4 टक्क्यांहून अधिक वाढ नोंदवण्यात आली. यानंतर एल अँड टी (L&T), अदानी पोर्ट्स, एशियन पेंट्स आणि महिंद्रा अँड महिंद्रा (M&M) या कंपन्यांच्या शेअर्समध्ये 2 टक्क्यांपेक्षा जास्त वाढ पाहायला मिळाली. मात्र, या तेजीच्या लाटेतही कोटक महिंद्रा बँकेच्या शेअर्समध्ये सुमारे 3 टक्क्यांची घसरण झाली आहे.

हेही वाचा: Palghar Railway Protest: विरारमध्ये प्रवाशांचा उद्रेक; साधी लोकल 'AC' केल्याने संताप, ट्रॅकवर उतरून सर्वसामान्यांनी रोखून धरली रेल्वे

सेक्टोरल इंडेक्समध्ये चौफेर 'हिरवळ'

बाजारातील ही तेजी सर्वसमावेशक असून निफ्टी स्मॉलकॅप 100 आणि मिडकॅप 100 निर्देशांकांनी 1 टक्क्यांहून अधिक वाढ नोंदवली आहे. क्षेत्रीय निर्देशांकांचा विचार करता निफ्टी ऑटो आणि निफ्टी रिअल्टी 2 टक्क्यांनी वधारले आहेत. निफ्टी पीएसयू बँक आणि इतर काही क्षेत्रांत 1.5 टक्क्यांपेक्षा जास्त वाढ दिसून आली. नॅशनल स्टॉक एक्सचेंजवर आज 2,246 शेअर्स वधारले असून केवळ 690 शेअर्समध्ये घसरण पाहायला मिळाली, जे बाजारातील भक्कम सकारात्मकतेचे निदर्शक आहे.

दुपारी 12 नंतर मार्केटमध्ये आणखी मोठी रॅली?

बाजार तज्ज्ञांच्या मते, हे निकाल सध्या केवळ सुरुवातीचे कल आहेत. विशेषतः बंगालमधील निकालांचे अंतिम चित्र स्पष्ट होण्यासाठी दुपारी 12 वाजेपर्यंत प्रतीक्षा करणे आवश्यक आहे. जर 12 वाजेनंतरही भाजपने बंगालमधील आपली आघाडी टिकवून ठेवली, तर सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये 2 ते 3 टक्क्यांपर्यंत मोठी रॅली येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. बाजारातील भीती मोजणारा निर्देशांक 'India VIX' 4.5 टक्क्यांनी घसरून 17.65 वर आला असून, गुंतवणूकदारांना राजकीय स्थैर्याचा मोठा आधार मिळाला आहे. 

(Disclaimer: शेअर बाजारातील गुंतवणूक जोखमीची आहे. नियम व अटी काळजीपूर्वक वाचा. जय महाराष्ट्र न्यूज कोणत्याही नफ्या-तोट्यास जबाबदार नाही. गुंतवणुकीपूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्या!)

हेही वाचा: Assembly Election Result 2026: काँग्रेसचा 10 वर्षांचा वनवास संपणार; 'या' राज्यांमध्ये स्पष्ट बहुमत, देशातून डाव्यांची सत्ता संपुष्टात येणार?


सम्बन्धित सामग्री