Thane First Planetarium : शनीची वलये अन् देवयानी दीर्घिका आता डोळ्यांच्या टप्प्यात; शहापूरमध्ये 5 एप्रिलला भव्य तारांगणाचे उद्घाटन

ठाणे जिल्ह्यातील शहापूरजवळ ‘सॅपो’ नावाचे अत्याधुनिक तारांगण आणि वेधशाळा उभी राहिली आहे.

Thane First Planetarium : शनीची वलये अन् देवयानी दीर्घिका आता डोळ्यांच्या टप्प्यात; शहापूरमध्ये 5 एप्रिलला भव्य तारांगणाचे उद्घाटन

ठाणे: शहराच्या लखलखत्या झगमगाटात हरवलेले आकाश आणि काजव्यासारखे मिणमिणणारे तारे पुन्हा एकदा डोळ्यांच्या टप्प्यात येणार आहेत. खगोलशास्त्राची ओढ असलेल्या आणि अंतराळातील गुपिते उलगडण्याची इच्छा बाळगणाऱ्या ठाणेकरांसाठी एक नवी सुवर्णसंधी चालून आली आहे.

शहापूरजवळील साकडबाव या निसर्गरम्य ठिकाणी जिल्ह्यातील पहिले अत्याधुनिक तारांगण आणि वेधशाळा उभी राहिली असून, या प्रकल्पाच्या निमित्ताने विज्ञानाची एक नवी क्षितीजं महाराष्ट्राच्या नकाशावर उमटणार आहेत. विशेष म्हणजे, एका खासगी उपक्रमातून साकारलेले हे भव्य दालन खगोलप्रेमींसाठी विज्ञानाची मोठी पर्वणी ठरणार आहे.

ठाणे जिल्ह्यातील या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचे नाव ‘सॅपो’ असे असून, निलेश ठाकूर आणि गिरीश ठाकूर या दोन बंधूंनी त्यांचा साडेतीन एकर जागेत हा विज्ञान सोहळा साकारला आहे. केवळ व्यावसायिक दृष्टीकोन न ठेवता, जनमानसात आणि विशेषतः तरुण पिढीमध्ये विज्ञानाची गोडी निर्माण व्हावी, या उदात्त हेतूने हा प्रकल्प उभा करण्यात आला आहे. या वेधशाळेचे अधिकृत उद्घाटन येत्या रविवार, 5 एप्रिल रोजी सायंकाळी पाच वाजता संपन्न होणार आहे. या सोहळ्यासाठी खगोल अभ्यासक  दा. कृ. सोमण आणि शहापूरचे आमदार दौलत दरोडा यांची प्रमुख उपस्थिती राहणार असून, हे उद्घाटन विज्ञानाच्या नव्या अध्यायाची सुरुवात ठरणार आहे.

हेही वाचा: Pakistan Ambassador: होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार? ट्रम्प यांचे सकारात्मक संकेत, पण पाकिस्तानच्या राजदूतांनी व्यक्त केली 'ही' भीती

या तारांगणाचे मुख्य आकर्षण म्हणजे 56 आसनांची व्यवस्था असलेले सुसज्ज ‘डोम थिएटर’. येथे बसून अवकाशातील ग्रह-ताऱ्यांची माहिती देणारे अर्धा ते एक तासाचे विशेष माहितीपट मराठी, हिंदी आणि इंग्रजी अशा तीन भाषांमध्ये पाहता येतील. तसेच, या वेधशाळेत 16, 14, 10 आणि सहा इंच व्यासाच्या चार महाकाय आरशाच्या दुर्बिणी (Telescopes) बसवण्यात आल्या आहेत. तंत्रज्ञानाचा उत्तम नमुना म्हणजे, आकाश निरीक्षणासाठी या वेधशाळेचे छप्पर रिमोटच्या साहाय्याने स्वयंचलितपणे मागे सरकते, ज्यामुळे निरीक्षकांना थेट अवकाशाचा अथांग कॅनव्हास पाहता येईल.

‘सॅपो’ प्रकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे येथे केवळ रात्रीच नाही, तर दिवसाही आकाशदर्शन घडवता येते. विशेष सोलर फिल्टर बसवलेल्या दुर्बिणीतून दिवसा सूर्याचे दर्शन, सौरडाग आणि उसळणाऱ्या सौरज्वाला अनुभवता येतील. तर रात्रीच्या नीरव शांततेत शनीची कंकणाकृती वलये, गुरूचे चंद्र आणि कोट्यवधी प्रकाशवर्ष दूर असलेल्या देवयानीसारख्या दीर्घिकांचे दर्शन घडवून आणण्यासाठी तज्ज्ञ स्वयंसेवक सज्ज राहणार आहेत. यातील दोन दुर्बिणी संगणकाशी जोडलेल्या असल्याने अवकाशातील या विलोभनीय दृश्यांचे छायाचित्रणही पर्यटकांना करता येणार आहे.

दूरवरून येणाऱ्या खगोलप्रेमींची गैरसोय होऊ नये, यासाठी येथे राहण्याची आणि खाण्याची चोख व्यवस्था करण्यात आली आहे. स्वतंत्र खोल्यांसोबतच मोठ्या गटांसाठी ‘डॉरमेटरी’ उपलब्ध असून, प्रदर्शन हॉल आणि सेल्फी पॉईंट्स हे पर्यटकांसाठी आकर्षणाचे केंद्र ठरतील. शहापूरमधील जुनोनी-कोथरा रोडवर वसलेला हा प्रकल्प शैक्षणिक सहलींसाठी आणि कौटुंबिक सहलींसाठी एक उत्तम ठिकाण म्हणून उदयाला येत आहे.

ज्यांना अंतराळातील या अद्भुत चमत्कारांचे साक्षीदार व्हायचे आहे, त्यांनी 7506266266 किंवा 7506322322 या क्रमांकावर संपर्क साधून नाव नोंदणी करणे अनिवार्य आहे. ठाकूर बंधूंच्या या जिद्दीतून उभे राहिलेले हे ‘सॅपो’ तारांगण केवळ शहापूरचेच नव्हे, तर संपूर्ण ठाणे जिल्ह्याचे भूषण ठरेल, यात शंका नाही. 

हेही वाचा: Summer Special Railway : आता प्रवासात दूर होणार गर्दीचा त्रास; मध्य रेल्वेसह पश्चिम रेल्वेची उन्हाळी स्पेशल गाड्यांची घोषणा

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number