हिमाचल: हिंदू धर्मात नवरात्री या सणाला विशेष महत्त्व आहे. या काळात, देवीने महिषासुराचा वध केला होता. हिंदू पंचंगानुसार, शारदीय नवरात्रीची सुरुवात अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या प्रतिपदेला केली जाते. मात्र, यंदा ही तिथी 22 सप्टेंबर 2025 रोजी असल्याने यादिवशी देवीची स्थापना करण्यात आली. या नऊ दिवसांच्या काळात, देवीच्या नऊ रुपांची पूजा केली जाते. सोबतच, 2 ऑक्टोबर रोजी विजयादशमी अर्थात दसरा साजरा होईल. नवरात्री विशेष आज आपण एका अशा मंदिराबाबत जाणून घेणार आहोत, जिथे, देवीची मूर्ती नाही. इतकंच नाही, तर याठिकाणी दिवा, तेल आणि वातीशिवाय वर्षानुवर्षे अग्नी प्रज्वलित असते. चला तर जाणून घेऊया.
भारतातील हिमाचल प्रदेश राज्यातील ज्वालामुखी नगरमध्ये ज्वाला देवीचे मंदिर आहे. हे मंदिर 51 शक्तिपीठांपैकी एक आहे. भाविक लाखोंच्या संख्येने या मंदिरात ज्वाला देवीच्या दर्शनासाठी येतात. हे मंदिर खूप ऐतिहासिक आहे. चला तर जाणून घेऊया ज्वाला देवी मंदिराचे ऐतिहासिक महत्त्व.
'हा' आहे 51 शक्तिपीठाचा इतिहास
पौराणिक कथेनुसार, आदिशक्तीचा जन्म प्रजापती दक्ष यांच्या घरी झाला होता. तिचे नाव सती ठेवण्यात आले. तरुणपणी सतीने स्वेच्छेने महादेवांशी विवाह केला. मात्र हा विवाह राजा दक्ष यांना कधीच मान्य नव्हते. यानंतर, राजा दक्ष यांनी भव्य यज्ञाचे आयोजन केले. या यज्ञासाठी राजा दक्षने सर्व देवी-देवतांना, ऋषी-मुनींना आणि सतीच्या बहिणींना बोलावण्यात आले होते. मात्र, सती आणि महादेवांना आमंत्रण दिलेच नाही. त्यामुळे, सती राजा दक्ष यांनी आयोजित केलेल्या यज्ञाच्या ठिकाणी पोहोचली. सतीला पाहून राजा दक्ष प्रचंड संतापले आणि त्यांनी महादेवांचा अपमान केला. राज दक्ष यांनी महादेवांचा अपमान केल्याने सतीने आत्मदहन केले.
जेव्हा महादेवांना या घटनेची माहिती मिळाली, तेव्हा महादेवांचा राग अनावर झाला आणि ते यज्ञाच्या ठिकाणी आले. त्यानंतर, महादेवांनी सतीचा मृतदेह हातात घेऊन तांडव करू लागले. त्यामुळे, विश्वावर संकट ओढवू नये आणि महादेवांना शांत करण्यासाठी भगवान विष्णूंनी सुदर्शन चक्राच्या मदतीने सतीच्या शरीराचे 51 तुकडे केले. हे तुकडे पृथ्वीवरील विविध ठिकाणी पडले. ज्याठिकाणी देवीच्या शरीराचे तुकडे पडले, त्याठिकाणी शक्तिपीठ निर्माण झाले. आज ही स्थळे देवीची पवित्र तीर्थक्षेत्रे म्हणून मानली जातात. त्यामुळे, भाविकांसाठी आजही ही 51 शक्तिपीठे भाविकांसाठी भक्ती, श्रद्धा आणि आध्यात्मिक उर्जेचे केंद्र आहेत.
हेही वाचा: Sadetin Shakti Peeh : ही आहेत महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठं; जाणून घेऊया त्यांच्या जन्माची कथा
मान्यतेनुसार, ज्वाला देवी मंदिर जिथे बांधण्यात आले आहे, तिथे देवी सतीची जीभ पडली होती. या मंदिराबाबत अनेक गोष्टी प्रसिद्ध आहेत. जेव्हा मुघल बादशाह अकबरला या मंदिराची माहिती मिळाली, तेव्हा अकबरने मंदिरातील अग्नी विझवण्यासाठी त्याचे सैन्य पाठवले. मात्र, बराच वेळ प्रयत्न करूनही अग्नी विझली नाही. यानंतर, अकबराने ज्वाला देवी मंदिरात सोन्याचे छत्र अर्पण केले.