नागपूर रेल्वे स्थानकावर हावडा एसी दुरंतो एक्सप्रेस सुटण्यावेळी धक्कादायक प्रकार घडल्याचे सीसीटीव्हीमध्ये कैद झाले आहे. नागपूर रेल्वे स्थानकावर आरपीएफ जवानाच्या सतर्कतेमुळे धावत्या ट्रेनमध्ये चढण्याचा प्रयत्न करणाऱ्या प्रवाशाचा जीव थोडक्यात बचावला. हावडा एसी दुरंतो एक्सप्रेस प्लॅटफॉर्म क्रमांक 4 वरून रवाना होत असताना एका प्रवाशाने धावत्या ट्रेनमध्ये चढण्याचा प्रयत्न केला.
यावेळी पाय घसरल्याने प्रवासी ट्रेन आणि प्लॅटफॉर्ममधील धोकादायक अंतरात पडण्याच्या स्थितीत आला. ही घटना लक्षात येताच बीट क्रमांक A-6 वर तैनात आरपीएफ जवान राकेश पाल यांनी तत्काळ धाव घेत प्रवाशाला पकडून वाचवलं. ट्रेन मॅनेजरने काही वेळ ट्रेन थांबवल्यानंतर प्रवासी सुखरूपपणे त्याच ट्रेनमधून पुढे रवाना झाला.
राकेश पाल यांच्या प्रसंगावधानामुळे संभाव्य मोठी दुर्घटना टळली. या घटनेनंतर रेल्वे स्थानकावर धावत्या ट्रेनमध्ये चढणे किंवा उतरणे किती धोकादायक ठरू शकते, हे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. प्रवाशांनी ट्रेन पूर्णपणे थांबल्यानंतरच चढावे किंवा उतरावे, तसेच घाईगडबडीत धावत्या ट्रेनचा पाठलाग करून चढण्याचा प्रयत्न करू नये, असे आवाहन रेल्वे प्रशासनाकडून वारंवार करण्यात येते.
नागपूर स्थानकावरील या घटनेत आरपीएफ जवानाने दाखवलेल्या तत्परतेचे आणि सतर्कतेचे कौतुक होत असून, त्यांच्या वेळीच केलेल्या मदतीमुळे संभाव्य मोठी दुर्घटना टळली. दरम्यान, धावत्या ट्रेनमध्ये चढू किंवा उतरू नका, असं आवाहन मध्य रेल्वेकडून करण्यात आलं आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.