काठमांडू : काठमांडू येथील त्रिभुवन आंतरराष्ट्रीय विमानतळावर आज, सोमवारी पहाटे तुर्की एअरलाइन्सच्या विमानाला आग लागल्याची घटना घडली. याबाबतची माहिती समोर आली आहे. त्यानुसार, आगीवर त्वरित नियंत्रण मिळवण्यात आले असून सर्व प्रवासी व कर्मचाऱ्यांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले आहे. इस्तंबूलहून काठमांडूला जाणाऱ्या विमानाच्या लँडिंगच्या वेळी उजव्या टायरला आग लागली. त्यामुळे सर्व प्रवाशांना बाहेर काढून त्यांची सुटका करण्यात आली. "TK726 या कॉल साइनचे विमान इस्तंबूलहून काठमांडूला जात होते आणि लँडिंगच्या वेळी त्याच्या टायरला आग लागली. अग्निशमन दलाच्या गाडीच्या साहाय्याने आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले आहे. सर्व प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे," अशी माहिती विमानतळ सुरक्षा विभागाचे एसपी राजकुमार सिलवाल यांनी एएनआय या वृत्तसंस्थेला फोनवरून दिली.
हेही वाचा : Nitesh Rane: 'AIMIM ही दहशतवादी संघटना, तर ओवैसी म्हणजे लादेन'; भाजप मंत्री नितेश राणेंची जहरी टीका
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, विमानात 278 प्रवासी आणि 11 कर्मचारी होते. विमानात असलेल्या प्रवाशांमध्ये संयुक्त राष्ट्रांचे काही अधिकारीही होते. सोशल मीडियावर फिरणाऱ्या व्हिडिओंमध्ये, त्रिभुवन आंतरराष्ट्रीय विमानतळावर विमान उतरत असताना तुर्की एअरलाइन्सच्या विमानाच्या उजव्या लँडिंग गिअरमधून आगीच्या ज्वाळा बाहेर पडताना आणि विमानातून दाट राखाडी धूर येताना दिसत होता. नंतर प्रवाशांना आपत्कालीन दरवाजांमधून बाहेर काढण्यात आले. आतापर्यंत विमानतळ प्रशासनाने किंवा विमान कंपनीने या घटनेबाबत कोणतेही अधिकृत निवेदन जारी केलेले नाही. आगीचे नेमके कारण अद्याप निश्चित झालेले नाही.