किशोर पगारे, उल्हासनगर: उल्हासनगर महानगरपालिकेतील स्वीकृत नगरसेवकाच्या पदावरून शिवसेना आणि भाजपमध्ये सुरू झालेला वाद आता अधिकच चिघळताना दिसत आहे. दोन दिवसांपूर्वी दोन्ही पक्षांच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांमध्ये आरोप-प्रत्यारोप झाल्यानंतर राजकीय वातावरण तापले होते. त्यानंतर आता शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकारी आणि महापौर निकम यांचे पती कमलेश निकम यांनी समर्थकांसह महापालिकेत जोरदार शक्तिप्रदर्शन केले.
रविंद्र चव्हाणांवर टीका केल्यानंतर वादाला सुरुवात
कमलेश निकम यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्यावर टीका करत त्यांना मंचेकर यांचे हस्तक असल्याचा आरोप केला होता. त्यांच्या या वक्तव्यानंतर दोन्ही पक्षांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू झाले. त्यानंतर भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषद घेत शिवसेना खासदार श्रीकांत शिंदे यांचे काम न करण्याची भूमिका जाहीर केल्याचे सांगण्यात आले.
या सगळ्या घडामोडींमुळे उल्हासनगरमध्ये महायुतीतील अंतर्गत संघर्ष चव्हाट्यावर आला. एवढेच नव्हे तर शिवसेना आणि भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषद घेऊन युती तुटल्याची घोषणाही केली होती.
भाजपकडून कमलेश निकम यांना आव्हान
दरम्यान, भाजपचे उल्हासनगर जिल्हाध्यक्ष आणि काही स्थानिक नेत्यांनी कमलेश निकम यांना महापालिकेत येऊन दाखवावे, असे आव्हान दिले होते. या आव्हानानंतर आज कमलेश निकम आपल्या समर्थकांसह उल्हासनगर महानगरपालिकेत दाखल झाले.
महापालिकेत दाखल झाल्यानंतर निकम समर्थकांनी जोरदार घोषणाबाजी केली. गटनेत्यांच्या कार्यालयासमोरही समर्थकांनी घोषणाबाजी करत शक्तिप्रदर्शन केले. त्यामुळे महापालिका परिसरात काही काळ राजकीय वातावरण तापले होते.
‘मी आरोपांवर ठाम’
यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना कमलेश निकम यांनी आपण केलेल्या आरोपांवर ठाम असल्याचे सांगितले. तसेच आपल्या हत्येचा कट रचला जात असल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केला.
“उद्या जर माझी हत्या झाली, तर भारतीय जनता पार्टीचे काही पदाधिकारी त्यासाठी जबाबदार असतील,” असा दावा कमलेश निकम यांनी पत्रकारांशी बोलताना केला. या आरोपांमुळे स्थानिक राजकारणात आणखी खळबळ उडाली आहे.
वरिष्ठ नेत्यांच्या भूमिकेकडे लक्ष
शिवसेना आणि भाजपमधील हा स्थानिक वाद आता कोणत्या टोकाला जातो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दोन्ही पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांनी हस्तक्षेप करून हा वाद मिटवला नाही, तर उल्हासनगरमधील महायुतीतील संघर्ष आणखी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता वरिष्ठ पातळीवरून या वादावर काय भूमिका घेतली जाते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.