मुंबई: हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते भरत कपूर यांचे सोमवारी (27 एप्रिल 2026) हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ते 80 वर्षांचे होते. मुंबईतील सायन रुग्णालयात दुपारी सुमारे साडेतीन वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाची बातमी समोर येताच चित्रपट आणि दूरचित्रवाणी क्षेत्रात शोककळा पसरली.
गेल्या तीन दिवसांपासून त्यांची प्रकृती खालावलेली होती आणि त्यांना यापूर्वीही रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, अशी माहिती कुटुंबीयांकडून देण्यात आली. त्यांच्या निधनानंतर त्यांच्यावर सायन परिसरातील स्मशानभूमीत त्याच दिवशी संध्याकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले.
दरम्यान, 30 एप्रिल रोजी सायंकाळी 5 ते 7 या वेळेत नॉर्थ बॉम्बे असोसिएशन (पंजाब असोसिएशन) येथे श्रद्धांजली सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या सभेला कुटुंबीय, मित्रपरिवार तसेच चित्रपटसृष्टीतील अनेक मान्यवर उपस्थित राहून त्यांना श्रद्धांजली वाहणार आहेत.
दिग्दर्शक अशोक पंडित यांनीही भारत कपूर यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला. त्यांनी सामाजिक माध्यमांवर भावनिक श्रद्धांजली अर्पण करताना लिहिले की, “ज्येष्ठ रंगभूमी आणि चित्रपट अभिनेते भरत कपूर यांच्या निधनाची बातमी अत्यंत दुःखद आहे. माझ्या कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळात त्यांच्यासोबत काम करण्याच्या अनेक आठवणी आहेत. ते अत्यंत उत्तम माणूस होते. ओम शांती.”
सुमारे चार दशकांच्या कारकिर्दीत भरत कपूर यांनी हिंदी चित्रपटसृष्टीत आपली वेगळी ओळख निर्माण केली. त्यांनी विविध भूमिकांमधून प्रेक्षकांचे मनोरंजन केले. ‘नूरी’ (1979), ‘राम बलराम’ (1980), ‘लव्ह स्टोरी’ (1981), ‘बाजार’ (1982), ‘गुलामी’ (1985), ‘आखरी रास्ता’ (1986), ‘सत्यमेव जयते’ (1987), ‘स्वर्ग’ (1990), ‘खुदा गवाह’ (1992) आणि ‘रंग’ (1993) यांसारख्या चित्रपटांमध्ये त्यांनी लक्षवेधी भूमिका साकारल्या.
चित्रपटांबरोबरच त्यांनी दूरचित्रवाणी क्षेत्रातही महत्त्वपूर्ण कामगिरी केली. ‘कॅम्पस’, ‘परंपरा’, ‘राहत’, ‘सांस’, ‘अमानत’, ‘भाग्यविधाता’, ‘तारा’, ‘चुनौती’ आणि ‘कहानी चंद्रकांता की’ यांसारख्या मालिकांमधून ते घराघरांत पोहोचले. त्यांच्या अभिनयामुळे त्यांनी प्रेक्षकांच्या मनात कायमचे स्थान निर्माण केले होते.
भरत कपूर यांच्या निधनामुळे हिंदी मनोरंजन क्षेत्राने एक अनुभवी आणि समर्पित कलाकार गमावला आहे. त्यांच्या अभिनयाची छाप आणि आठवणी चाहत्यांच्या मनात कायम जिवंत राहतील.