Beetroot Chilla Recipe: सकाळचा नाश्ता हा दिवसभराची ऊर्जा ठरवतो, पण रोज तेच-तेच मेन्यू पाहून कंटाळा येणं स्वाभाविक. शिवाय, आजच्या धावपळीच्या जीवनशैलीत थकवा, त्वचेचा तेज कमी होणे किंवा पचनाच्या तक्रारी ही सामान्य गोष्ट झाली आहे. अशावेळी एक अशी रेसिपी आहे जी रंगाने आकर्षक, चवीलाही छान आणि आरोग्यासाठीही फायदेशीर आणि ती म्हणजे बीटरूट चीला. बीटला सुपरफूड का म्हणतात याचं कारण म्हणजे त्यात असलेलं लोह, फायबर, व्हिटॅमिन्स आणि अँटिऑक्सिडंट्स. हे तत्त्व शरीराला नैसर्गिक ऊर्जा देतात आणि त्वचेला आतून ग्लो आणण्यासाठी मदत करतात.
अनेकांना बीटरूट सलाडमध्ये किंवा थेट खायला आवडत नाही, पण त्या भाजीतून हेल्दी रेसिपी तयार केली तर ती आवडीने खाल्ली जाते. या चीलाचा गुलाबी रंग दिसायलाही आकर्षक आहे आणि मुलांनाही हा नाश्ता आवडतो. सकाळी बनवायला पटकन तयार होणारी रेसिपी असल्याने कामावर जाणाऱ्यांसाठी ही एक परफेक्ट क्विक ऑप्शन ठरू शकते.
हेही वाचा:Diwali Leftover Faral: घरात फराळ उरलाय? फेकू नका! ही भन्नाट रेसिपी ट्राय करा; घरचे करतील मिनिटात फस्त
बीटरूट चिल्ला कसा बनवायचा?
एका मोठ्या भांड्यात बेसन घ्या. त्यात मीठ, हळद, जिरे, थोडी तिखट किंवा आवडीचे मसाले टाका. त्यात किसलेले बीटरूट मिसळा. बीटरूटसोबत आले पेस्ट, बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या, कोथिंबीर घालल्यास चव आणखी खुलते. आता मिश्रणात पाणी थोडं थोडं घालत मऊ आणि मध्यम घट्ट पीठ तयार करा. हे मिश्रण खूप पातळ नको, नाहीतर चीला नीट पसरत नाही. तवा गरम करा, थोडं तेल टाका, आणि आवश्यक तेवढं मिश्रण पातळ थरात पसरवा. दोन्ही बाजूंनी सोनेरी रंग येईपर्यंत तव्यावर पलटत शिजवा. हा चीला दही किंवा पुदिन्याच्या चटणीसोबत सर्व्ह केल्यास चव आणखी वाढते.
आरोग्याचे फायदे?
बीटमध्ये असलेले अँटिऑक्सिडंट्स त्वचेसाठी नैसर्गिक डिटॉक्सप्रमाणे काम करतात. रक्तातील हिमोग्लोबिन सुधारण्यासाठीही बीट उपयुक्त मानला जातो. रोज सकाळच्या नाश्त्यात हा पर्याय नियमित केला तर थकवा आणि कमजोरीपासून अंतर ठेवणे शक्य आहे. शिवाय फायबरमुळे पचन सुधरतं, त्यामुळे गॅस, ॲसिडिटी, कब्ज यासारख्या समस्या कमी होण्यास मदत.
हेही वाचा: Diet Tips: रिकाम्या पोटी खा 'ही' फळे, शरीर होईल निरोगी आणि ऊर्जावान, आहारतज्ज्ञांचा सल्ला जाणून घ्या
आजकाल पॅकेज्ड आणि इंस्टंट नाश्त्यांमुळे शरीरात जास्त प्रमाणात सोडियम, प्रिझर्वेटिव्ह आणि अनावश्यक फॅट जाते. पण अशा घरच्या सोप्या हेल्दी रेसिपींमुळे नैसर्गिक आहारातून शरीराला आवश्यक पोषण देणं अगदी शक्य आहे. बीटरूट चीला हा नुसताच नाश्त्यासाठी नाही, तर हलक्या दुपारच्या जेवणासाठी किंवा संध्याकाळच्या स्नॅकसाठीही उत्तम आहे.
रंग, चव आणि आरोग्य या तिन्हीचं सुंदर कॉम्बिनेशन असल्यामुळे याला ‘गुलाबी हेल्दी एनर्जी डोसा’ असंही म्हणता येईल. रोज सकाळच्या डे-स्टार्टसाठी हा एक परफेक्ट पर्याय ठरू शकतो.
(Disclaimer : ही माहिती केवळ सामान्य ज्ञानासाठी प्रदान केली आहे. जय महाराष्ट्र या माहितीची कोणतीही हमी देत नाही. आरोग्यविषयक कोणताही निर्णय घेण्यापूर्वी तज्ज्ञ किंवा डॉक्टरांचा सल्ला घ्या.)