Diwali Leftover Faral: दिवाळी म्हणजे घराघरांचा सण, आनंद, उजळलेल्या दिव्यांचा लखलखाट आणि स्वयंपाकघरात दरवळणारा फराळाचा सुगंध. शंकरपाळी, चकली, शेव, चिवडा, करंजी, बारीक किंवा जाड लाडू, खाऱ्या पुऱ्या प्रत्येक घरात काहीना काही तरी बनतंच. सुरुवातीची दोन तीन दिवस तर हे खाणं थांबत नाही. पण जसजसे दिवस जातात तसतसा हा तोच तोच फराळ खूप जड वाटू लागतो. 'खाऊन खाऊन कंटाळा आलाय' असंच मनात येत राहतं. पण यानंतर दुसरी समस्या हा फराळ टाकायचा कसा? इतक्या भावाने, श्रमाने केलेला पदार्थ कचरापेटीत कसा टाकणार?
अशा वेळीच घरातली सगळ्यात हुशार कल्पना जन्म घेते उरलेल्या फराळापासून नवीन पदार्थ. आणि सध्या सोशल माध्यमांवर एक कल्पना प्रचंड चर्चेत आहे; फराळाचा पराठा. ऐकायला वेगळं, पण प्रत्यक्षात अगदी सोपं. त्यातही सर्वात उत्तम म्हणजे ज्या फराळाची चव आता जिभेवर गोड वाटत नाही, तो त्याच पराठ्यात विलीन होतो. खाणाऱ्याला कळतही नाही की यात फराळ लपलेला आहे.
हेही वाचा: Banana Chips Recipe: फक्त 10 मिनिटांत तयार करा चटपटीत बनाना चिप्स, रेसिपी वाचून तोंडाला पाणी सुटेल
साहित्य
-
उरलेला फराळ (चकली, शंकरपाळी, शेव, लाडू, चिवडा, खाऱ्या पुऱ्या)
-
एक वाटी किसलेला दुधी
-
दोन वाट्या गहू पीठ
-
एक चमचा बेसन
-
एक मोठा चमचा तिखट
-
एक चमचा धने पूड
-
चतुर्थांश चमचा हळद
-
चिमूटभर हिंग
-
मीठ चवीनुसार
-
एक चमचा तीळ
-
एक चमचा ओवा
-
कसुरी मेथी थोडीशी
-
कोथिंबीर बारीक चिरलेली
-
तेल किंवा तूप
-
पाणी आवश्यकतेनुसार
हेही वाचा: Sandwich Without Bread: ब्रेडशिवाय सँडविच? होय! रव्याची ही हेल्दी रेसिपी ट्राय करा घरच्या घरी
कृती
सर्वप्रथम उरलेला फराळ एकत्र करून मिक्सरमध्ये बारीक पूड करा. एका भांड्यात किसलेला दुधी घ्या. त्यात गहू पीठ, बेसन, तिखट, धने पूड, हळद, हिंग, मीठ, ओवा, तीळ, कसुरी मेथी आणि कोथिंबीर घालून सगळं चांगलं एकत्र करा. त्यात फार थोडं थोडं पाणी घालत मऊसूत पीठ मळून घ्या. दुधीतूनही पाणी सुटत असल्याने पाणी हाताळताना काळजी घ्या.
आता पीठाचे गोळे करून साध्या पोळीसारखे लाटा. मध्ये फराळाची पूड भरा. पुन्हा गोळा करून पराठ्यासारखा लाटा. तव्यावर गरम तेल किंवा तूप सोडा आणि दोन्ही बाजूंनी खरपूस भाजून घ्या. बस्स तुमचा फराळ पराठा तयार.
चहा किंवा दह्यासोबत हा पराठा दिला तर घरातले सर्वच चकित होतील कारण एकदम नवीन चव आणि त्या मागे लपलेलं दिवाळीचं उरलेलं गोड-खारं रहस्य.