Wednesday, November 19, 2025 12:59:02 PM

Banana Chips Recipe: फक्त 10 मिनिटांत तयार करा चटपटीत बनाना चिप्स, रेसिपी वाचून तोंडाला पाणी सुटेल

बाजारातील तेलकट चिप्सऐवजी घरच्या घरी बनवा कुरकुरीत, चवदार आणि हेल्दी केळीचे चिप्स. ही झटपट रेसिपी काही मिनिटांत तयार होते आणि संध्याकाळच्या स्नॅकसाठी परफेक्ट पर्याय ठरते.

banana chips recipe फक्त 10 मिनिटांत तयार करा चटपटीत बनाना चिप्स रेसिपी वाचून तोंडाला पाणी सुटेल

Banana Chips Recipe: कधी कधी चटपटीत आणि कुरकुरीत काहीतरी खायची इच्छा होते, आणि आपण लगेच बाजारातून रेडिमेड चिप्स आणतो. पण हे बाजारातील चिप्स तेलकट, केमिकलयुक्त आणि शरीरासाठी हानिकारक असतात. विशेषतः मुलं जर रोज अशी स्नॅक्स खात असतील, तर त्याचा परिणाम त्यांच्या आरोग्यावर होतो. मग प्रश्न पडतो चवही मिळावी आणि आरोग्यही टिकून रहावं, असं काय खावं? याचं सोपं उत्तर आहे. घरच्या घरी बनवलेले केळीचे चिप्स!

ही रेसिपी फक्त 10 ते 15 मिनिटांत तयार होते आणि बाजारातील चिप्सपेक्षा अधिक स्वादिष्ट व पौष्टिक असते. चला तर जाणून घेऊ या घरच्या घरी केळीचे कुरकुरीत चिप्स कसे बनवायचे ते!

हेही वाचा: Sandwich Without Bread: ब्रेडशिवाय सँडविच? होय! रव्याची ही हेल्दी रेसिपी ट्राय करा घरच्या घरी

लागणारे साहित्य

  • कच्ची केळी- 3 ते 4 

  • तळण्यासाठी तेल

  • मीठ- चवीनुसार

  • लाल तिखट- १ टीस्पून (ऐच्छिक)

  • आमचूर पावडर किंवा चाट मसाला- थोडासा

कृती

  1. केळी सोलणे:
    प्रथम केळीची दोन्ही टोके कापून साल काढून घ्या. सोललेली केळी काही वेळ ठेवली तर काळी पडतात, त्यामुळे सोलताच लगेच वापरणे चांगले.

  2. स्लाइस तयार करणे:
    चिप्स बनवण्यासाठी केळीचे अगदी पातळ तुकडे करा. यासाठी तुम्ही चिप्स कटर किंवा तीक्ष्ण चाकूचा वापर करू शकता.

  3. पाण्यात भिजवणे:
    सोलून झाल्यानंतर केळीचे तुकडे थोडा वेळ मीठाच्या पाण्यात ठेवावेत. यामुळे ते काळे पडत नाहीत आणि तळल्यानंतर छान कुरकुरीत होतात.

  4. तळणे:
    कढईत तेल तापवा आणि त्यात केळीचे तुकडे हळूहळू सोडा. मध्यम आचेवर तळा, जोपर्यंत ते सोनेरी रंगाचे आणि कुरकुरीत होतात.

  5. मसाला मिक्स करणे:
    चिप्स तळून झाल्यावर त्यातील जादा तेल काढण्यासाठी टिश्यू पेपरवर ठेवा. नंतर त्यावर मीठ, लाल तिखट, आमचूर पावडर किंवा चाट मसाला भुरभुरवा आणि नीट मिक्स करा.

  6. साठवण:
    पूर्ण थंड झाल्यावर हे चिप्स एअरटाइट डब्यात भरून ठेवा. हे 8 ते 10 दिवस कुरकुरीत राहतात.

हेही वाचा: Homemade Raisins: महागड्या मनुक्यांना म्हणा 'नाही'; फक्त 50 रुपयांत घरच्या घरी बनवा स्वादिष्ट मनुके

टिप

  • चिप्स अधिक हेल्दी बनवायचे असतील, तर एअर फ्रायरचा वापर करा.

  • मीठाऐवजी काळे मीठ आणि मसाल्यात मिरपूड घातल्यास स्वाद वाढतो.

  • तुम्ही हिरवी मिरची पावडर, ओरेगॅनो किंवा चिली फ्लेक्ससुद्धा वापरू शकता.

घरच्या घरी बनवलेले केळीचे चिप्स हे चव, कुरकुरीतपणा आणि हेल्थ या तिन्हींचं परफेक्ट कॉम्बिनेशन आहे. मुलांना देण्यासाठी सुरक्षित, आणि मोठ्यांसाठी संध्याकाळी टी टाइम स्नॅक म्हणून उत्तम पर्याय! पुढच्यावेळी स्नॅक खायची इच्छा झाली, तर दुकानात धाव घेण्याऐवजी ही झटपट रेसिपी करून पाहा तुम्हालाही फरक जाणवेल. 


सम्बन्धित सामग्री