Diwali Recipe: दिवाळी म्हटलं की फराळाशिवाय सण अपुरा! चकली, करंजी, लाडू यांच्या रांगेत अनारसालाही एक वेगळी ओळख आहे. पण हा पदार्थ जितका स्वादिष्ट तितकाच किचकटही. अनेक गृहिणी अनारसे बनवताना त्यांचा पोत बिघडतो, ते तळताना फुटतात किंवा तेलात विरघळतात. अशा वेळी सगळा उत्साह कमी होतो. पण काही सोप्या टिप्स लक्षात ठेवल्यास अगदी पहिल्याच प्रयत्नात तुम्ही परफेक्ट खुसखुशीत आणि जाळीदार अनारसे बनवू शकता.
सर्वप्रथम, तांदूळ निवडणे हेच यशाचं पहिलं पाऊल आहे. कोणताही साधा तांदूळ चालतो, पण तो चिकट नसायला हवा. चिकट भात होणारा तांदूळ वापरल्यास पीठ व्यवस्थित होत नाही आणि अनारसे तळताना बिघडतात. तांदूळ तीन दिवस पाण्यात भिजवा आणि दररोज पाणी बदलत राहा. यामुळे तांदळाचा पोत मऊ राहतो आणि त्याला एकसंध पीठ बनवता येतं.
हेही वाचा: Chakli Recipe: घरच्या घरी सोप्या पद्धतीने बनवा स्वादिष्ट चकली; जाणून घ्या टिप्स
तांदूळ वाळवताना सुती कापड वापरणं महत्त्वाचं आहे. तांदूळ कोरडे झाल्यानंतर त्याचं बारीक पीठ करून घ्या आणि ते चाळणीने चाळा. यामुळे गुठळ्या राहत नाहीत आणि पीठ अधिक हलकं होतं.
आता पुढचा महत्त्वाचा टप्पा म्हणजे गोडाचा प्रमाण. जर तुम्ही गूळ वापरत असाल तर गूळ हा पिठाच्या अर्धा असावा म्हणजे दोन वाट्या पिठाला एक वाटी गूळ. साखर वापरत असल्यास ती थोडी कमी ठेवा दोन ग्लास पिठाला दीड ग्लास साखर पुरेशी आहे. जास्त साखर घातल्यास अनारसे तळताना विरघळतात.
एक गोष्ट विशेष लक्षात ठेवा या पिठाला पाणी अजिबात लावू नका. फक्त गूळ किंवा साखर मिसळल्यानंतर २-३ दिवस मुरवून ठेवा. पिठाचा पोत मऊ आणि एकसंध झाला तरच तळण्यासाठी तयार करा.
तळताना तेलाचं तापमान संतुलित असणं खूप गरजेचं आहे. तेल जास्त गरम झालं तर अनारसे बाहेरून जळतात आणि आतून कच्चे राहतात. तेल थंड असल्यास ते तळताना वितळतात. त्यामुळे तेल मध्यम गरम ठेवा.
हेही वाचा: Homemade Shrikhand: सणासुदीच्या दिवशी घरच्या घरी बनवा स्वादिष्ट श्रीखंड; जाणून घ्या चक्का बनवण्याची सोपी पद्धत
जर अनारसे तेलात विरघळत असतील, तर साखर जास्त असल्याचं हे चिन्ह आहे. अशावेळी थोडं तांदळाचं पीठ अधिक मिसळा. आणि जर अनारसे कडक वा भाकरीसारखे होत असतील, तर त्यात थोडं केळं किंवा थोडी साखर मिसळून बघा. हे मिश्रण पुन्हा मुरवून ठेवल्यास त्यांचा पोत सुधारेल.
अशा या छोट्या पण उपयुक्त टिप्स लक्षात ठेवल्यास अनारसे बनवणं हा किचकट नव्हे तर आनंददायक अनुभव ठरेल. या दिवाळीत या टिप्स वापरून पहा आणि घरच्यांना खुश करा खुसखुशीत, जाळीदार आणि परफेक्ट अनारसांनी.