नवरात्र उत्सवानंतर दिवाळीच्या सणाची लगबग सुरु होते. फराळ, नवीन कपडे, घरासाठी नवीन वस्तू, दिवे-पणत्या, रांगोळी, उटणं यांची खरेदी मोठ्या प्रमाणावर केली जाते. काही ठिकाणी फराळ घरीच बनवला जातो. मात्र त्याआधी येतं ते म्हणजे घराची संपूर्ण साफसफाई, हे अत्यंत महत्त्वाचं आणि जिकिरीचं काम आहे. ज्यात गृहिणींबरोबरच घरातील सर्व मंडळी कामाला लागतात.
अनेकदा साफसफाई लवकर सुरु केली तरी ती दिवाळीपर्यंत पूर्ण होत नाही. त्यामुळेच घराच्या साफसफाईसाठी 4 ते 5 दिवस लागतात आणि प्रचंड थकवा येतो. पण जर योग्य प्लॅनिंग केलं तर हेच काम 1 दिवसात होऊ शकतं. कसं? जाणून घ्या…
दिवाळीच्या साफसफाईसाठी सकाळ ते संध्याकाळचा स्मार्ट प्लॅन:
सकाळी 7 ते 9 – किचन:
सुरुवात किचनपासून करा, कारण सगळ्यात जास्त वेळ इथेच लागतो. गॅस, ओटा, फ्रीजच्या मागची जागा स्वच्छ करा. एका बादलीत गरम पाणी + लिंबू + बेकिंग सोडा घ्या, याने तेलकट डाग 2 मिनिटांत निघतात. सर्व डबे एकाच वेळी उन्हात ठेवा.
सकाळी 9 ते 12 – हॉल आणि बेडरूम:
सगळे पडदे, बेडशीट काढून वॉशिंग मशीनला लावा. तोपर्यंत फॅन, ट्यूबलाईट पुसून घ्या. कपाटातले सगळे कपडे काढू नका, फक्त नको असलेले कपडे एका मोठ्या पिशवीत वेगळे करा. लादी पुसताना पाण्यात थोडं मीठ आणि फिनाईल टाका, लादी चकचकीत होईल.
दुपारी 12 ते 2 – बाथरूमची स्वच्छता:
बाथरूमसाठी वेगळा वेळ ठेवा. नळावरील पांढरे डाग घालवण्यासाठी व्हिनेगरने पुसा. टाइल्ससाठी बेकिंग सोडा बेस्ट आहे.
दुपारी 2 ते 4 – बाल्कनी आणि मुख्य दरवाजा:
दिवाळीत लक्ष सगळ्यात आधी मुख्य दरवाज्यावर जातं. त्यामुळे मुख्य दरवाजा, तोरण, रांगोळीची जागा स्वच्छ करा. बाल्कनी असेल तर तिथल्या जाळ्या काढून घ्या.
संध्याकाळी 4 ते 6 – फायनल टच:
आता फक्त सजावट बाकी. काढलेले पडदे, बेडशीट परत लावा. घरात एका कोपऱ्यात धूप किंवा अगरबत्ती लावा, घर फ्रेश वाटेल.
महाराष्ट्र ते देश-विदेश, ताज्या घडामोडी एका क्लिकवर-
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.