मुंबई: वजन कमी करण्यासाठी काय खावं आणि काय टाळावं, यावरून अनेकांचा गोंधळ उडतो. काहीजण भात आणि गहू पूर्णपणे टाळण्याचा विचार करतात. मात्र, जर तुम्ही डाएट करण्यासाठी पौष्टिक पर्याय निवडले तर वजन कमी होण्याबरोबरच आरोग्यही सुधारते. यासाठी ज्वारी आणि नाचणीची भाकरी सर्वोत्तम पर्याय ठरू शकतात. अशातच, तुम्हाला हा प्रश्न नक्कीच पडला असेल की, वजन कमी करण्यासाठी ज्वारी की नाचणी? कोणती भाकरी खावी? चला जाणून घेऊया.
ज्वारीची भाकरी खाण्याचे फायदे: ज्वारीची भाकरी हा प्रोटिनचा उत्तम स्रोत आहे. याशिवाय, ज्वारीमध्ये फायबर, जीवनसत्त्वे आणि खनिजे भरपूर प्रमाणात असतात, ज्यामुळे ती आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. ज्वारीची भाकरी खाल्ल्याने स्नायूपेशी मजबूत होतात. वजन कमी करण्यासाठी फायबरचे महत्त्व खूप आहे आणि ज्वारीमध्ये फायबर मुबलक प्रमाणात असते, त्यामुळे पोट जास्त वेळ भरलेले राहते आणि वारंवार भूक लागत नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, ज्वारीचा ग्लायसेमिक इंडेक्स (GI) मध्यम असल्यामुळे रक्तातील साखरेची पातळी अचानक वाढत नाही आणि शरीराची ऊर्जा टिकून राहते. ज्वारीच्या भाकरीत लोह आणि अँटी-ऑक्सिडंट्स असल्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि शरीराला निरोगी ठेवण्यास मदत करते. ज्वारीमध्ये कॅलरी कमी आणि प्रोटीन जास्त असल्याने वजन नैसर्गिकरीत्या कमी होण्यास मदत मिळते. त्यामुळे ज्वारीची पोळी ही वजन कमी करू इच्छिणाऱ्यांसाठी अत्यंत उपयोगी ठरते.
नाचणीची भाकरी खाण्याचे फायदे: हाडे मजबूत ठेवण्यासाठी नाचणीची भाकरी खाणे अत्यंत फायदेशीर मानले जाते. ज्वारीच्या तुलनेत नाचणीच्या भाकरीत फायबरचे प्रमाण जास्त असल्याने पोट भरल्यासारखे राहते आणि भूक कमी लागते. मिळालेल्या माहितीनुसार, नाचणीचा ग्लायसेमिक इंडेक्स (GI) सर्वात कमी आहे. त्यामुळे, मधुमेहचा आजार असलेल्या रुग्णांना नाचणीची भाकरी उत्तम पर्याय आहे. नाचणीची भाकरी खाल्ल्याने रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित राहते आणि शरीराला संतुलित ऊर्जा मिळते.
हेही वाचा: How To Control Sugar: रक्तातील साखर नियंत्रित करण्यासाठी 'या' गोष्टी पाण्यात मिसळा आणि सकाळी रिकाम्या पोटी प्या
वजन कमी करण्यासाठी कोणती भाकरी फायदेशीर?
वजन कमी करण्यासाठी दोन्ही पोळी फायदेशीर आहेत. तुम्ही आहारात एक दिवस ज्वारीची आणि दुसऱ्या दिवशी नाचणीची पोळी समाविष्ट करू शकता. किंवा दोन्ही धान्य समान प्रमाणात मिक्स करून त्यापासून तयार केलेली पोळी खाणं हे अधिक संतुलित पर्याय ठरेल.
(Disclaimer: ही माहिती केवळ सामान्य ज्ञानासाठी प्रदान केली आहे. जय महाराष्ट्र या माहितीची कोणतीही हमी देत नाही. आरोग्यविषयक कोणताही निर्णय घेण्यापूर्वी तज्ज्ञ किंवा डॉक्टरांचा सल्ला घ्या.)