महाराष्ट्रात दुधाच्या दरात वाढ झाल्यामुळे सर्वसामान्य ग्राहकांवर महागाईचा नवा भार पडला आहे. काही प्रमुख दूध उत्पादक संघटनांनी प्रतिलिटर 2 ते 3 रुपयांनी दरवाढ जाहीर केली आहे. याचा थेट परिणाम गृहिणींपासून ते चहावाल्यांपर्यंत सर्वच ग्राहकांवर होणार आहे. दुधाच्या दरवाढीमागे अनेक कारणे आहेत. गाई आणि म्हशींसाठी लागणाऱ्या चाऱ्याच्या किंमतीत मोठी वाढ झाली आहे. शिवाय, इंधनाच्या वाढत्या किमतीमुळे वाहतूक खर्चही वाढला आहे. तसेच, शेतीसाठी लागणाऱ्या खते आणि औषधांच्या किमतीत वाढ झाल्याने दूध उत्पादक शेतकऱ्यांचे उत्पादन खर्च वाढले आहेत. परिणामी, दूध संघटनांनी दरवाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.
हेही वाचा: नाना पटोलेंची शिंदे पवारांना ऑफर
ग्राहकांवर परिणाम
या दरवाढीचा मोठा फटका सर्वसामान्य ग्राहकांना बसणार आहे. आधीच महागाईमुळे त्रस्त असलेल्या लोकांसाठी दूध महाग होणे म्हणजे आणखी एक आर्थिक भार आहे. अनेक हॉटेल आणि चहावालेही या दरवाढीमुळे त्यांच्या उत्पादनांची किंमत वाढवण्याची शक्यता व्यक्त करत आहेत.
शेतकऱ्यांचे म्हणणे
दुधाच्या दरवाढीमुळे दूध उत्पादक शेतकऱ्यांना फायदा होईल, असे काही तज्ज्ञांचे मत आहे. दुधाच्या उत्पादन खर्चात मोठी वाढ झाल्यामुळे शेतकऱ्यांना अधिक पैसे मिळावेत म्हणून दरवाढ आवश्यक असल्याचे दूध उत्पादक सांगत आहेत. मात्र, शेतकऱ्यांना खरोखरच अधिक नफा मिळेल का, याबाबत शंका आहे, कारण अनेक वेळा मध्यस्थ आणि दूध संघटनाच जास्त नफा कमावतात.
सध्या गाईच्या दुधासाठी 54 ते 56 रुपये मोजावे लागत आहेत. नव्या दरवाढीनुसार आता एक लिटर दुधासाठी ५६ ते ५८ रुपये मोजावे लागणार आहे. तर सध्या म्हशीच्या एक लिटर दुधासाठी 70 ते 72 रुपये मोजावे लागत आहेत. नव्या दरवाढीनुसार म्हशीच्या दुधासाठी 72 ते 74 रुपये मोजावे लागणार आहे.
दरम्यान येत्या काळात दुधाच्या दरात आणखी वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. विशेषतः सणासुदीच्या काळात दूध आणि दुग्धजन्य पदार्थांच्या मागणीत वाढ होते. त्यामुळे पुढील काही महिन्यांत दूध दर पुन्हा वाढू शकतात. सर्वसामान्य नागरिकांसाठी ही दरवाढ मोठी समस्या ठरणार असून सरकार आणि दूध उत्पादक संघटनांनी तोडगा काढण्याची गरज आहे.