Friday, May 16, 2025 02:26:41 PM

पपई न्याहारीमध्ये खाल्ल्याचे मोठे फायदे.. उन्हाळ्यात पचनक्रिया राहील ठणठणीत

सकाळी नाश्ता योग्य नसेल तर पोट बिघडण्याची शक्यता जास्त असते. न्याहारीत पपई खाल्ल्यानं पचनक्रिया सुलभ होते. बद्धकोष्ठतेपासून मुक्त होण्यासाठी पपईचा उपयोग होतो.

पपई न्याहारीमध्ये खाल्ल्याचे मोठे फायदे उन्हाळ्यात पचनक्रिया राहील ठणठणीत

Papaya For Digestive System: सकाळची न्याहारी चांगली असेल तर पोटाचं आरोग्यही चांगलं राहील. पण जर न्याहारीतील पदार्थ आणि न्याहारीची वेळ योग्य नसेल तर पोट बिघडण्याची शक्यता जास्त असते. यासाठी न्याहारीत पपई खाल्ल्यानं रात्रीच्या जेववणातील पोटात साठून राहिलेले पदार्थ आतड्यातून पुढे सरकण्यास मदत होते. यामुळे पुढे दिवसभराची पचनक्रिया सुलभ होते. पपईमध्ये फायबर आणि पाण्याचं प्रमाण जास्त असतं, यामुळे आतड्यांची हालचाल सुलभ होणं आणि बद्धकोष्ठतेचा त्रास कमी होण्यास मदत होते.

उन्हाळ्यात अनेकदा पोट खराब होतं. खाण्याच्या छोट्या छोट्या सवयींचाही आरोग्यावर मोठा परिणाम होतो. तुम्हालाही पोटाच्या समस्या जाणवत असतील आणि पोट नीट साफ होत नसेल, तर पपई हे फळ पचनासाठी खूप फायदेशीर आहे. पोट खराब असेल तर पोटात गॅस तयार होणं, पोट गुरगुरणं, पोट दुखणं किंवा पोट व्यवस्थित साफ न होणं म्हणजेच बद्धकोष्ठता देखील होते. पपईमुळे, पोटातील आधीच्या जेवणातले मागे राहिलेले विषारी पदार्थ बाहेर काढून टाकते. यामुळे पचन सुधारतं आणि बद्धकोष्ठतेसारख्या समस्या जाणवत नाहीत.

हेही वाचा - झोप सुधारायचीये आणि सकाळी उठलं की फ्रेश वाटलं पाहिजे? फॉर्म्युला 10-3-2-1-0 वापरा अन् जादू पहा..

पोटाची अंतर्गत स्वच्छता
सकाळचा नाश्ता चांगला असेल तर पोटाचं आरोग्यही चांगलं राहील. सकाळी पपई खाल्ल्यानंतर पोट फुगल्यासारखं वाटत नाही. पपईमध्ये फायबर आणि पाण्याचं प्रमाण जास्त असतं, यामुळे आतड्यांची हालचाल सुलभ करण्यासाठी मदत होते. यामुळे पोट चांगलं स्वच्छ होतं. पपईमध्ये आढळणारा पपेन हा घटक पचनक्रिया सुरळीत करतो. बद्धकोष्ठता आणि आम्लपित्त या समस्येपासूनही आराम मिळतो.

त्वचा चमकदार करण्यासाठी उपयुक्त
पपईत व्हिटॅमिन सी, बीटा कॅरोटीन आणि अँटी-ऑक्सिडंट्स असतात. यामुळे कोलेजन निर्मितीला चालना मिळते. त्वचेला नुकसान पोहोचवणारे घटक यामुळे नष्ट होतात. पपई खाल्ल्यानं चेहऱ्यावरच्या मुरुमांचं प्रमाण कमी होतं, पपईमुळे त्वचा मऊ होते आणि चेहऱ्यावर नैसर्गिक चमक दिसून येते. पपई खाल्ल्याने पचनक्रिया सुलभ होते. कारण, पपईमधील फायबर पोट व्यवस्थित साफ करण्यास मदत करतात. पोट साफ असल्याचा त्वचेवरही चांगला परिणाम होतो.

यकृत आणि हृदयासाठी देखील फायदेशीर
पपईत फोलेट, पोटॅशियम आणि फायबर असल्यानं, रक्तदाब आणि कोलेस्टरॉलची पातळी कमी होते. यातून शरीराला मिळणारे अँटी-ऑक्सिडंट्स जळजळ कमी करण्यासाठी उपयुक्त असतात. पपई यकृताच्या आरोग्यासाठीही फायदेशीर आहे.

रोगप्रतिकारक शक्तीसाठी उपयुक्त
पपई म्हणजे व्हिटॅमिन सीचा समृद्ध स्रोत. त्यामुळे पपई खाल्ल्यानं शरीराची रोगप्रतिकारक शक्ती चांगली होते. यामुळे आजारही दूर राहतात. सकाळी रिकाम्या पोटी एक वाटी पपई खाऊ शकता. न्याहारीत सर्वात आधी, पपई खाणं आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे.

या टिप्स लक्षात ठेवा -
- पपई खाल्ल्यानंतर अर्ध्या तासानंतरच दुसरं काही खा किंवा प्या. 
- पपई खाल्ल्यानंतर सुमारे दोन तासांपर्यंत दूध आणि दुधाचे पदार्थ खाऊ नयेत. कोणत्याही फळासोबत, फळाच्या लगेच आधी आणि लगेच नंतर दूध आणि दुग्धजन्य पदार्थ खाणे आयुर्वेदाच्या दृष्टीने चुकीचे आहे.
- पपई आंबट फळांसोबत खाऊ नका.
- सकाळी चहा पिण्याची सवय असेल तर पपई खाल्ल्यानंतर लगेच चहा पिऊ नका. शक्यतो सकाळचा चहा बंद केलेला चांगला. याऐवजी गरम पाणी प्यावे.
- पूर्णपणे पिकलेली पपईच खरेदी करा. कच्ची पपई खरेदी केली तर ती पिकेपर्यंत वाट पाहा.

हेही वाचा - AC मधून निघणारे पाणी ठरेल उपयुक्त; टाकून देऊ नका, असा करा वापर

(Disclaimer : ही माहिती केवळ सामान्य ज्ञानासाठी प्रदान केली आहे. जय महाराष्ट्र या माहितीची कोणतीही हमी देत नाही. आरोग्यविषयक कोणताही निर्णय घेण्यापूर्वी तज्ज्ञ किंवा डॉक्टरांचा सल्ला घ्या.)


सम्बन्धित सामग्री