Tiredness for Whole Day : सकाळची सुरुवात प्रोटीनयुक्त आहाराने करणे, दिवसभर भरपूर पाणी पिणे, आहारात भाज्या आणि फळांचा समावेश करणे हे सर्व करूनही जर तुम्हाला दिवसभर थकवा आणि सुस्ती जाणवत असेल, तर याचे कारण केवळ अपुरी झोप किंवा ताण (स्ट्रेस) नसून, तुमच्या आहारातल्या काही पोषण-विषयक चुका असू शकतात. हल्ली अनेक लोकांमध्ये ही समस्या वाढत असल्याचे दिसून येत आहे. एका पर्सनलाईज्ड न्यूट्रिशन ॲपच्या माहितीनुसार, गेल्या काही महिन्यांत 'जेवणानंतर थकवा' (Tired After Meals) आणि 'नेहमी झोप आल्यासारखे वाटणे' यांसारख्या समस्या गुगलवर मोठ्या प्रमाणात शोधल्या गेल्या आहेत.
सकस आहार घेऊनही थकवा का?
सिम्पल ॲपच्या न्यूट्रिशन डायरेक्टर आणि डायटिशियन रो हंट्रिस यांच्या मते, चांगला आहार घेऊनही थकवा जाणवणे ही सामान्य बाब आहे. यामागे अनेक कारणे असू शकतात; जसे की, शरीरातील हलकी सूज (इंफ्लेमेशन), सततचा ताण, झोपेची गुणवत्ता किंवा महिलांमध्ये मासिक पाळीचा काळ. केवळ ताणामुळेही पचन आणि पोषक तत्वांचे शोषण (Nutrient Absorption) बिघडते. तसेच, जर तुमची झोप सतत पूर्ण होत नसेल, तर शरीरातील ग्लुकोजची प्रक्रिया (Glucose Processing) बिघडते. तज्ज्ञांच्या मते, थकवा येण्याचे एकमेव कारण जीवनशैली नसून, आपण काय खात आहोत, हे देखील असू शकते.
ऊर्जेऐवजी थकवा देणाऱ्या 5 पोषण-विषयक चुका
1. आवश्यक पोषक तत्वांची कमतरता (Micronutrient Deficiency)
डाएटमध्ये प्रोटीन आणि हेल्दी फॅट्सवर लक्ष केंद्रित करणे महत्त्वाचे आहे, पण शरीराला त्याहून अधिक गरज असते. लोह (Iron), मॅग्नेशियम (Magnesium) आणि व्हिटॅमिन बी12 (Vitamin B12) सारखी सूक्ष्म पोषक तत्वे शरीरातील ऊर्जा निर्मिती चक्राला मदत करतात. हीच तत्त्वे अन्नाचे ऊर्जेत रूपांतर करण्याचे काम करतात. जर तुमच्या आहारात त्यांची कमतरता असेल, तर बाहेरून तुमचा आहार हेल्दी दिसलात, तरी आतून शरीर सुस्त पडते. सततचा थकवा हे याचे स्पष्ट संकेत आहेत.
हेही वाचा - Benefits Of Groundnut : शेंगदाणे आरोग्यासाठी सुपरफूड; अंडी-काजूंपेक्षा अधिक प्रोटीन, जाणून घ्या रोज किती शेंगदाणे खावेत
2. चुकीचे फूड कॉम्बिनेशन (Wrong Food Combination)
अनेकदा फक्त फळे खाऊन किंवा रस पिऊन नाश्ता केल्यास लवकरच भूक लागते किंवा थकवा जाणवतो. याचे कारण फूड कॉम्बिनेशन आहे. फक्त फळे किंवा रसात फायबर असले तरी, प्रोटीन आणि हेल्दी फॅट्सची कमी प्रमाणात असतात. यासाठी फळांसोबत चणे, मोड आलेली कडधान्ये, पीनट बटर किंवा सुका मेवा यांसारखे प्रोटीन स्रोत आहारात समाविष्ट करावेत. यामुळे पचनक्रिया थोडीशी मंदावते, रक्तातील साखरेची पातळी संतुलित राहते आणि दिवसभर ऊर्जा टिकून राहते.
3. चुकीच्या वेळी जेवण (Eating At Wrong Time)
प्रत्येकाचे जेवण करण्याची योग्य वेळ वेगळी असू शकते, कारण आपले शरीर नैसर्गिक बॉडी क्लॉक (सर्केडियन रिदम) वर चालते. पचायला जड असलेले पदार्थ किंवा जास्त जेवण करून लगेच झोपल्यामुळे शरीरातील ग्लुकोजची पातळी वाढते आणि झोपेच्या गुणवत्तेवर परिणाम होतो. काही लोकांना इंटरमिटेंट फास्टिंग (Intermittent Fasting) सूट होते, तर काही लोक दर 3 ते 4 तासांनी हलके जेवण घेणे पसंत करतात. तुमच्या शरीराची लय (रिदम) समजून घेऊन त्यानुसार जेवणाची वेळ निश्चित करा.
4. शरीरात पाण्याची कमतरता (Dehydration)
शरीरातील पाण्याची अगदी थोडीशी कमतरताही थकवा, डोकेदुखी, झोप लागणे आणि एकाग्रतेचा अभाव यांसारख्या समस्या वाढवते. दिवसभर पुरेसे पाणी पिणे, हा ऊर्जा पातळी स्थिर ठेवण्याचा सर्वात सोपा मार्ग आहे.
5. कॅफिनचा अतिरेक
कॅफिन (Caffeine) तात्पुरत्या स्वरूपात ऊर्जा वाढवते, परंतु जास्त प्रमाणात घेतल्यास ते तुमची झोपेची सायकल बिघडवते. यामुळे प्रत्येक एनर्जी ड्रिंकनंतर तुम्हाला आणखी जास्त थकवा जाणवू शकतो. शरीराच्या नैसर्गिक ऊर्जा चक्रावर परिणाम होऊ नये यासाठी, कॅफिनचे सेवन दुपारपूर्वी मर्यादित ठेवणे योग्य आहे.
हेही वाचा - Health Tips: मधुमेह असल्यास डाळिंबाचा रस प्यावा का?, जाणून घ्या
(Disclaimer : ही माहिती केवळ सामान्य ज्ञानासाठी प्रदान केली आहे. जय महाराष्ट्र या माहितीची कोणतीही हमी देत नाही. आरोग्यविषयक कोणताही निर्णय घेण्यापूर्वी तज्ज्ञ किंवा डॉक्टरांचा सल्ला घ्या.)