BMC Election 2026: महापालिका निवडणुकीचा प्रचार रंगात आलेला असतानाच, मुंबईत सत्ताधारी महायुतीला मोठे खिंडार पडले आहे. कांदिवली आणि गोरेगाव परिसरातील शिवसेना (शिंदे गट) आणि काँग्रेसच्या बड्या पदाधिकाऱ्यांनी आज उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर विश्वास दर्शवत ‘शिवबंधन’ बांधले. ऐन निवडणुकीच्या तोंडावर झालेल्या या पक्षांतरामुळे उत्तर मुंबईत उद्धव ठाकरे यांची ताकद वाढली असून शिंदे गटासाठी हा मोठा राजकीय हादरा मानला जात आहे.
कांदिवलीत शिंदे गटाला भगदाड
मुंबई महापालिकेच्या प्रभाग क्रमांक 28 (हनुमान नगर, कांदिवली पूर्व) मधील शिंदे गटाच्या फळीला उद्धव ठाकरेंनी सुरुंग लावला आहे. अनेक वर्षांपासून स्थानिक पातळीवर कार्यरत असलेल्या पदाधिकाऱ्यांनी आज अधिकृतपणे ठाकरे गटात प्रवेश केला. यात अश्विनी पवार (महिला शाखासंघटक, शिंदे गट), भरत पाटील, विनोद गुजर, विजय यादव, गणेश खंदारे, महेश शर्मा आणि सुधाकर पाटील (सर्व उपशाखाप्रमुख) यांचा सवावेश असून या सर्वांनी ‘मातोश्री’ निवासस्थानी जाऊन उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत पक्षात प्रवेश केला.
हेही वाचा – सकाळी भाजपात संध्याकाळी पुन्हा घरवापसी, कार्यकर्त्याचा मात्र अजब दावा; नेमकं काय घडलं?
गोरेगावात काँग्रेसलाही फटका
दरम्यान, केवळ शिंदे गटच नव्हे, तर काँग्रेसलाही या निवडणुकीत गळती लागली आहे. गोरेगाव वॉर्ड क्रमांक 50 मधील काँग्रेसचे मुंबई जनरल सेक्रेटरी अनिल शर्मा आणि टीना शर्मा यांनी आपल्या समर्थकांसह ठाकरे गटाची वाट धरली आहे. उद्धव ठाकरे यांनी स्वतः या सर्व नेत्यांच्या मनगटावर शिवबंधन बांधून त्यांचे स्वागत केले.
हेही वाचा – Uday Samant On BJP: ‘टीका करायला अजित पवार समर्थ आहेत, आपण फक्त…’; उदय सामंतांचा भाजपला टोला
कांदिवली पूर्व प्रभाग क्रमांक २८ मधील हनुमान नगर येथील शिंदेगटाच्या महिला शाखासंघटक अश्विनी पवार, उपशाखाप्रमुख भरत पाटील, उपशाखाप्रमुख विनोद गुजर, उपशाखाप्रमुख विजय यादव, उपशाखाप्रमुख गणेश खंदारे, उपशाखाप्रमुख महेश शर्मा, उपशाखाप्रमुख सुधाकर पाटील ह्यांनी आज मातोश्री येथे शिवसेना… pic.twitter.com/HwUeEL2OXk — ShivSena – शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray (@ShivSenaUBT_) January 3, 2026
‘मातोश्री’वर नेत्यांची मांदियाळी
या पक्षप्रवेशावेळी ठाकरे गटाचे सचिव आमदार मिलिंद नार्वेकर, विभागप्रमुख संतोष राणे, उपविभागप्रमुख प्रशांत कोकणे, राजू पाध्ये, कैलास कणसे आणि दिनेश राव यांसारखे दिग्गज नेते उपस्थित होते. उमेदवारी वाटपानंतर निर्माण झालेली नाराजी आणि बदललेले राजकीय वारे यामुळे मुंबईतील अनेक प्रभागांमध्ये आता काटे की टक्कर पाहायला मिळणार आहे.