स्वप्ननगरी मुंबईत लोकलने प्रवास करत असताना अनेक घटना कानावर पडतात. मुंबईकरांची लाईफलाइन असलेल्या लोकलमधून लाखो जण प्रवासी करतात. रोजच्या प्रवाशांना गर्दीची कल्पनाही असते, पण कधीकधी याच लोकलमध्ये असं काही घडतं की डोळ्यांवर विश्वासच बसत नाही, मन अगदी सुन्नं होतं. अनेक वेळा प्रवाशांना लोकलमधील गर्दीमुळे सफोकेशन, चक्कर येणं किंवा फिट येणं यांसारख्या त्रासामुळे स्वत:चा जीव देखील गमवावा लागतो.
नुकतीच पनवेल-सीएसएमटी लोकलमधील एका मुलीला चालत्या ट्रेनमधून ढकलण्याची घटना ताजी असतानाच आणखी एक धक्कादायक प्रकार चेंबूरहून पनवेल लोकलमधून समोर आला आहे. 2 डिसेंबर रोजी दुपारी 1.37 वाजता चेंबूरहून पनवेल लोकलने प्रवास करणाऱ्या 25 वर्षीय हर्ष पटेलला प्रवासादरम्यान अचानक तीव्र हृदयविकाराचा झटका आला ज्यामुळे तो चक्कर येऊन बेशुद्ध झाला. हर्षला बेशुद्ध झालेलं पाहून लोकलमध्ये असलेल्या इतर प्रवाशांनी तत्काळ रेल्वे पोलिसांना माहिती दिली.
त्यानंतर चेंबूरहून सुटलेली लोकलं वाशी स्थानकात पोहचताच पोलीस आणि प्रवाशांनी त्याला स्थानकाबाहेर असलेल्या 108 रुग्णवाहिकेपर्यंत नेले. मात्र त्यावेळेस रुग्णवाहिका चालक जेवणासाठी गेल्याने त्याला वेळेवर वैद्यकीय उपचार मिळाले नाही, ज्यामुळे त्याचा दुर्दैवाने मृत्यू झाला. त्यावेळेस रुग्णवाहिका चालकाची वाट पाहत 15 मिनिटे हर्षला रुग्णवाहिकेत ठेवण्यात आले होते. अधिक उशिर झाल्याने रेल्वे पोलिसांनी त्याला आपल्या सरकारी जीपमधून नवी मुंबई महानगरपालिका रुग्णालयात नेले. मात्र रुग्णालयात पोहोचताच डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
त्यानंतर हर्षच्या बहिणीने म्हणजेच अमिकाने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करून रेल्वे प्रशासनावर गंभीर आरोप केले आहेत. वाशी स्थानकात स्ट्रेचर, व्हीलचेअर किंवा प्राथमिक उपचारांची कोणतीही सक्षम व्यवस्था नव्हती. प्रवाशांना हर्षला कपड्याच्या साहाय्याने उचलून सबवेमधून न्यावे लागले. रुग्णवाहिका चालकाचा कोणताही 'बॅकअप' प्रशासनाकडे उपलब्ध नव्हता. जीआरपी चौकीत तक्रार घेण्यास टाळाटाळ करण्यात आली आणि त्यांना सीएसएमटी येथील DRM कार्यालयात पाठवण्यात आले. असं म्हणत तिने सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेतील त्रुटी आणि आपत्कालीन परिस्थितीत मिळणाऱ्या वैद्यकीय मदतीवर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहेत.