पुण्यातील शिरूर शहरातून माणुसकीला काळीमा फासणारी एक संतापजनक घटना समोर आली आहे. चांगल्या पगाराच्या नोकरीचे आमिष दाखवून एका 22 वर्षीय परप्रांतीय तरुणीला लॉजमध्ये डांबून तिच्यावर सामूहिक अत्याचार करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
या प्रकरणात पीडितेला पांढऱ्या रंगाची नशा देणारी पावडर खाऊ घालून तिच्यावर पाशवी अत्याचार करण्यात आले. या प्रकरणी शिरूर पोलीस ठाण्यात सात जणांविरोधात भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांन्वये गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
पुणे जिल्ह्यातील चाकण परिसरात वास्तव्यास असलेल्या आणि मूळ छत्तीसगड येथील एका 22 वर्षीय तरुणीला चांगल्या पगाराचे काम मिळवून देतो, असे सांगून आरोपींनी तिला कारमधून शिरूर येथे आणले. 19 ऑगस्ट ते 21 ऑगस्ट या दोन दिवसांच्या कालावधीत शिरूर गावच्या हद्दीतील ‘हॉटेल मार्वल इन लॉजिंग’ येथील खोलीमध्ये तरुणीला डांबून ठेवण्यात आले.
तिथे तिला बळजबरीने नशा देणारी पांढरी पावडर खायला देऊन तिच्या इच्छेविरुद्ध सामूहिक अत्याचार करण्यात आला. तसेच इतर आरोपींनी तिला मारहाण, शिवीगाळ व दमदाटी करत लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले. या नरकयातनेतून सुटका झाल्यानंतर पीडित तरुणीने शिरूर पोलीस ठाण्यात धाव घेत घडलेला सर्व प्रकार पोलिसांसमोर मांडला.