Parbhani Accident : परभणी जिल्ह्यातून एक अत्यंत हृदयद्रावक घटना समोर आली आहे. कीर्तनाचा आध्यात्मिक आनंद घेऊन घराकडे परतणाऱ्या तीन वारकऱ्यांवर काळाने झडप घातली. परभणी-जिंतूर महामार्गावर दुचाकी आणि कारचा भीषण अपघात झाला, ज्यामध्ये तिन्ही वारकऱ्यांचा जागीच अंत झाला. या घटनेमुळे जिंतूर तालुक्यासह संपूर्ण वारकरी संप्रदायावर शोककळा पसरली आहे.
नेमकी घटना काय?
प्राप्त माहितीनुसार, परभणी तालुक्यातील पिंपळा येथे हिवाळी कीर्तन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्यासाठी जिंतूर तालुक्यातील बोर्डी आणि मुळा येथील तीन वारकरी गेले होते. रात्री उशिरापर्यंत हरिनाम संकीर्तनाचा आस्वाद घेतल्यानंतर, पहाटे एकच्या सुमारास हे तिघेही दुचाकीवरून (MH-22) आपल्या गावाकडे परतत होते. परभणी-जिंतूर रस्त्यावरील झरी गावाजवळ असलेल्या लोअर दुधना कालव्यापाशी त्यांच्या दुचाकीला एका कारने जोरात धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता की, दुचाकीचा चक्काचूर झाला आणि तिन्ही वारकरी गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने परभणी जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले, मात्र उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
परभणी जिल्ह्यावर शोककळा
या अपघातात ह.भ.प. माऊली दिगंबरराव कदम (वय 30, रा. बोर्डी), ह.भ.प. प्रसादराव कदम (वय 45, रा. बोर्डी), ह.भ.प. दत्ता माणिकराव कराळे (वय 30, रा. मुळा) यांचा मृत्यू झाला आहे. अपघाताची बातमी समजताच मृतांच्या नातेवाईकांनी जिल्हा रुग्णालयात एकच हंबरडा फोडला. विशेष म्हणजे, मृतांपैकी दोघे हे पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या मूळ गावातील (बोर्डी) रहिवासी होते. तरुण वारकऱ्यांचा अशा प्रकारे अंत झाल्याने संपूर्ण गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून कार चालकाचा शोध घेतला जात आहे.