सातारा : सातारा- ठोसेघर मार्गावर महाकाय दरड कोसळली आहे. त्यामुळे दोन्ही बाजूची वाहतूक ठप्प झाली आहे. दरड कोसळल्याने नागरिकांचे हाल होत आहेत.
सातारा- ठोसेघर मार्गावर बोरणे गावाजवळ अतिवृष्टीने दरड ढासळली असून या मार्गावरील वाहतूक रात्री उशिरापासून बंद आहे. रात्री मुक्कामी असलेल्या जांभे चाळकेवाडी राजापुरी या गाड्या पलीकडेच तर अलीकडच्या एसटी बसेस अलीकडेच अडकल्या आहेत. दुधाचे टेम्पो ही रस्त्यावरच अडकून पडले आहेत. यामुळे प्रवासी विद्यार्थी तसेच मुंबईला जाणारे लोक गाडीतच अडकले आहेत. सकाळी दहा वाजेपर्यंत या ठिकाणी कोणतीही यंत्रणा पोहोचली नव्हती. या परिसरात पावसाची संततधार सुरूच आहे. येथील अल्हाददायक निसर्गरम्य वातावरण धबधबे पवनचक्क्यांचे पठार पाहण्यासाठी पर्यटकांची सतत वर्दळ सुरू असते. पडलेली दरड तात्काळ बाजूला सारून वाहतूक व्यवस्था सुरळीत करावी अशी मागणी या परिसरातील वाहनधारक, ग्रामस्थ आणि पर्यटक करत आहेत.
हेही वाचा : ई-केवायसी न केल्यास रेशनकार्डमधून नाव कमी होणार
सातारा ठोसेघर मार्गावर जवळच निसर्गरम्य ठोसेघर धबधबा
ठोसेघर धबधबा सातारा शहरापासून 20 किमी अंतरावर असलेल्या ठोसेघर या छोट्याशा गावाजवळील एक निसर्गरम्य ठिकाण आहे. येथे अनेक धबधबे आहेत, त्यापैकी काही 15 ते 20 मीटर उंचीचे आणि एक सुमारे 200 मीटर उंचीचा आहे. संपूर्ण महाराष्ट्रातून लोक या भागात भेट देण्यासाठी येतात. पावसाळ्यात या ठिकाणी मुसळधार पाऊस पडतो आणि त्यामुळे धबधब्यांमध्ये जास्त पाणी असते आणि ते अधिक नेत्रदीपक असतात. जवळचा परिसर शांत आणि शांत आहे, डोंगराळ भागात स्वच्छ तलाव आणि गडद जंगले आहेत.