Sunday, November 16, 2025 06:09:47 PM

Manchar Leopard Attack: बिबट्याने ऊसातून झडप घातली अन्..., आजोबांनी सांगितला धक्कादायक प्रकार

बिबट्याच्या हल्ल्याची एक घटना पुन्हा एकदा समोर आली आहे. बिबट्याने चिमुकलीवर झडप घालून तिला ऊसाच्या शेतात घेऊन गेला. ही धक्कादायक घटना पुणे जिल्ह्याच्या शिरूर तालुक्यातील पिंपरखेड गावात घडली आहे.

manchar leopard attack बिबट्याने ऊसातून झडप घातली अन् आजोबांनी सांगितला धक्कादायक प्रकार

पुणे: बिबट्याच्या हल्ल्याची एक घटना पुन्हा एकदा समोर आली आहे. बिबट्याने चिमुकलीवर झडप घालून तिला ऊसाच्या शेतात घेऊन गेला. ही धक्कादायक घटना पुणे जिल्ह्याच्या शिरूर तालुक्यातील पिंपरखेड गावात घडली आहे.

आजोबांना पाणी देण्यासाठी म्हणून चिमुकली घराबाहेर आली आणि बिबट्याने तीच संधी साधली. क्षणाचाही विलंब न करता त्याने तिच्यावर झडप घातली, खाली दाबलं आणि फरफटत पुन्हा उसाच्या शेतात ओढून नेलं. शिवन्या शैलेश बोम्बे असं या साडेपाच वर्षीय चिमुकलीचं नाव आहे. या घटनेत चिमुकलीचा मृत्यू झाला आहे. 

या घटनेमुळे मयत चिमुकलीच्या कुटुंबीयांना मानसिक धक्का बसला आहे. या चिमुकलीचे वडील आणि आजी यांना मंचर उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. बिबट्याच्या वारंवार होणाऱ्या हल्ल्याच्या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन वनविभागाने बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी करण्यात येत आहे.

हेही वाचा: Cough Syrup Row: ED ची मोठी कारवाई! चेन्नईतील कोल्ड्रिफ उत्पादक श्रीसन फार्मा आणि संबंधित ठिकाणांवर छापेमारी

शिरूर तालुक्यातील पिंपरखेड येथील शेतकरी अरूण देवराम बोंबे यांच्या घरामागील शेतात जेसीबीचे काम सुरू होते. यावेळी त्यांची नात शिवन्या शैलेश बोंबे ही आजोबा अरुण बोंबे यांना पिण्यासाठी पाणी घेऊन येत असताना शेजारच्या ऊसात दबा धरून बसलेल्या बिबट्याने शिवन्यावर झडप टाकून तिला ऊसात नेलं. आजोबा अरुण देवराम बोंबे यांनी हे पाहिल्यानंतर त्यांनी धाव घेत ऊसात शिरलेल्या बिबट्याच्या तावडीतून शिवन्याला सोडवले. तिला उपचारासाठी मंचर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु त्यापूर्वीच तिचा मृत्यू झाला होता.

आईनं टाहो फोडला
चिमुकलीची आई नुसती ढसाढसा रडत होती. मुलीची अवस्था पाहून अक्षरश: आईनं टाहो फोडला. आपल्या मुलीला असं रक्तबंबाळ अवस्थेत रुग्णालयात आणण्यात आलं. बिबट्याने चिमुकलीवर झडप घातल्यानंतर आईची अवस्था खूप बिकट झाली होती. घटनेविषयी बोलताना, "मी घरीच होते. मोठ्या पोराला घेऊन पळत गेले. तोवर बाबांनी मुलीला बिबट्याच्या तावडीतून सोडवलं होतं. मुलीला रुग्णालयात दाखल केलं" असे आईने सांगितले. हे बोलताना त्या आईचे शब्दही फुटत नव्हते.

आजोबांनी सांगितला धक्कादायक प्रकार
"आमच्या जेसीबीचं काम चालू होतं. ती पोर पाण्याची बाटली घेऊन येत होती. समोर ऊसातून येऊन बिबट्याने झडप घातली. ते पाहताच क्षणी आम्हीही चिमुकलीला बिबट्याच्या तावडीतून सोडवण्यासाठी त्याच्यावर झडप घातली. त्याने धरलं खाली दाबलं अन् तो फरफटत उसात घेऊन गेला. ही घटना 12 ऑक्टोबर रोजी साडे नऊच्या आसपास घडली. आम्ही तिला वाचवण्यासाठी आरडाओरडा केल्यानंतर मग त्याने तिला सोडलं. मात्र तोपर्यंत ती पुरती घायाळ झाली होती, खूप रक्तस्राव होत होता. या भागात बिबट्याचे हल्ले सारखे होत असतात. याआधी कुत्र्याची पिल्लही पळवली आहेत". घटनेबद्दल धक्कादायक अनुभव आजोबांनी सांगितला.


सम्बन्धित सामग्री