भिवंडी येथील शांतीनगर भागातील एका गुलाबजाम विक्रीच्या दुकानात विक्रीसाठी ठेवलेल्या गुलाबजामुनच्या मोठ्या भांड्यात चक्क जिवंत उंदीर फिरताना आढळल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्यानंतर नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत असून, मिठाईच्या स्वच्छतेसह नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्नही उपस्थित झाला आहे.
हेही वाचा- शालेय बसच्या फीबाबत मोठी अपडेट! UPI ऐवजी चेक किंवा क्रेडिट कार्डचा पर्याय; काय आहे कारण?
दरम्यान हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताच अन्न व औषध प्रशासन (एफडीए) विभागाच्या पथकाने संबंधित दुकानावर बुधवारी छापा टाकून दुकानदाराला नोटीस बजावत दुकानाला टाळे ठोकण्यात आले. दुकानदाराकडे अन्न व्यवसाय नोंदणी प्रमाणपत्रासह आवश्यक कागदपत्रे नसल्याची बाब कारवाईदरम्यान उघडकीस आली आहे. पुढील आदेश मिळेपर्यंत खाद्यपदार्थांची विक्री थांबवण्याचे निर्देश देण्यात आलेत अशी माहिती समोर आली.
व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये विक्रीसाठी ठेवलेल्या गुलाबजामुनच्या मोठ्या कंटेनरमध्ये एक जिवंत उंदीर फिरताना दिसत आहे. मिठाईच्या खाद्यपदार्थात उंदीर फिरत असल्याचे दृश्य पाहून नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. या घटनेनं मिठाई दुकानांमधील स्वच्छता, खाद्यपदार्थांची साठवणूक आणि ग्राहकांच्या आरोग्याच्या सुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. या प्रकरणात संबंधित दुकानदाराच्या व्यवस्थापनावर प्रश्न चिन्ह उपस्थित होत आहे.