Wednesday, June 18, 2025 03:39:11 PM

डॉक्टरांचा हलगर्जीपणा; प्रसूती दरम्यान महिलेच्या पोटात राहिला कापडी तुकडा

एक धक्कादायक प्रकार आपल्याला छत्रपती संभाजीनगर येथे पाहायला मिळत आहे, जिथे एका खासगी रुग्णालयात एका महिलेची शस्त्रक्रिया करून तिच्या पोटातून कापडाचा तुकडा काढण्यात आला आहे.

डॉक्टरांचा हलगर्जीपणा प्रसूती दरम्यान महिलेच्या पोटात राहिला कापडी तुकडा

विजय चिडे, प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर: अनेकजण डॉक्टरांना देवमाणूस मानतात. याचं कारण म्हणजे डॉक्टर रुग्णाला जीवनदान देतात. मात्र, याच डॉक्टरांचा एक धक्कादायक प्रकार आपल्याला छत्रपती संभाजीनगर येथे पाहायला मिळत आहे, जिथे एका खासगी रुग्णालयात एका महिलेची शस्त्रक्रिया करून तिच्या पोटातून कापडाचा तुकडा काढण्यात आला आहे.

हेही वाचा: 'वेळ आल्यास...'; राऊतांच्या टीकेवर संजय शिरसाटांचा पलटवार

नेमकं प्रकरण काय?

10 मे रोजी वाशिम जिल्ह्यातील रिसोड येथे एका खासगी रुग्णालयात एका महिलेची शस्त्रक्रिया करून पोटात कापडाचा तुकडा काढण्यात आला आहे. नातेवाईकांनी अशी तक्रार केली होती की, 'वाशिम जिल्ह्यातील रिसोड येथे एका खासगी रुग्णालयात प्रसूती दरम्यान महिलेच्या पोटात कापडाचा तुकडा राहिला आहे'. पोटातून कपडा काढलेल्या महिला रुग्णाचे नाव सुरेखा गणेश काबरा आहे.

सुरेखा यांची 10 मे रोजी रिसोड येथील एका रुग्णालयात सिजेरियन प्रसूती झाली होती. मात्र, त्यानंतर सुरेखा यांचे पोट सतत दुखू लागल्याने त्यांनी वाशिम येथे सोनोग्राफी करून त्यांचा रिपोर्ट सिजेरियन प्रसूती करणाऱ्या डॉक्टरांना दाखविला. तेव्हा त्या डॉक्टरांनी मूत्राशयाचा आजार असल्याचे सांगून उपचार घेण्यास सांगितले. मात्र, त्यानंतरही सुरेखा यांचे पोट दुखतच राहिले. जेव्हा सुरेखा यांना छत्रपती संभाजीनगर शहरातील एका खासगी रुग्णालयात दाखवण्यात आले, तेव्हा सुरेखा यांच्या पोटात गॉज पीस म्हणजेच कापसाचा तुकडा असल्याचे निदर्शनास आले. यानंतर, क्षणाचाही विलंब न करता तातडीने शस्त्रक्रिया करून गॉज पीस म्हणजेच कापसाचा तुकडा काढण्यात आला.

हेही वाचा: अवकाळी पावसानंतरही मराठवाड्यात पाणीटंचाई कायम

या प्रकारामुळे काबरा कुटुंबाला शारीरिक आणि मानसिक त्रास सहन करावा लागला. याप्रकरणी, पती गणेश काबरा यांनी रिसोड येथील संबंधित डॉक्टरांविरोधात तक्रार दाखल केली असून, 'वैद्यकीय निष्काळजीपणाची चौकशी करण्यात यावी', अशी मागणी केली आहे. 'रुग्णांच्या जीवाशी खेळ करणाऱ्या अशा निष्काळजी डॉक्टरांवर कठोर कारवाई करण्यात यावी', अशी मागणी स्थानिक नागरिकांकडूनही केली जात आहे. मात्र, या प्रकरणामुळे वैद्यकीय क्षेत्रातील उत्तरदायित्वावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.


सम्बन्धित सामग्री