Pune Crime : विद्येचे माहेरघर असलेल्या पुणे शहरात गुन्हेगारीने पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. हडपसरमधील बी. टी. कवडे रस्ता परिसरात शनिवारी मध्यरात्री एका टोळीने हातात कोयते घेऊन अक्षरशः तांडव केलं. या घटनेचे सर्वात धक्कादायक वैशिष्ट्य म्हणजे, दहशत माजवणाऱ्या या पाच जणांच्या टोळीमध्ये चार तरुणांसोबत एका तरुणीचाही समावेश होता. या कोयता गँगमधील या तरुणीने केलेल्या राड्यामुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
मध्यरात्रीचा थरार: 6 दुकाने आणि वाहनांची तोडफोड
शनिवारी रात्री जेव्हा नागरिक झोपण्याच्या तयारीत होते, तेव्हा तोंडाला मास्क आणि रुमाल बांधलेले पाच जण हातात तलवारी आणि कोयते नाचवत रस्त्यावर आले. या टोळीने आरडाओरडा करत परिसरातील 6 दुकानांच्या काचा आणि शटर फोडून मोठ्या प्रमाणावर नासधूस केली. एवढेच नाही, तर रस्त्यावर उभ्या असलेल्या कार आणि दुचाकींवरही या गुंडांनी सपासप वार केले. भरवस्तीत सुरू असलेला हा नंगानाच पाहून प्रत्यक्षदर्शी हादरून गेले होते.
हेही वाचा - Rohit Shetty: रोहित शेट्टी यांच्या घराबाहेर मध्यरात्री गोळीबार; फक्त गोळीबारच नाही तर…; जुहू परिसरात कडक पोलीस बंदोबस्त
पुण्यात आता 'लेडी डॉन'ची एन्ट्री?
पुण्यातील कोयता गँगमध्ये आतापर्यंत केवळ मुलांचा सहभाग पाहायला मिळत होता, मात्र या घटनेने पोलीस प्रशासनासमोर नवीन आव्हान उभे केले आहे. सीसीटीव्ही फुटेजमध्ये एक तरुणी हातात कोयता घेऊन दुकानांची तोडफोड करताना स्पष्टपणे दिसत आहे. "कोणी मध्ये आलं तर याद राखा!" अशा धमक्या देत या तरुणीने आणि तिच्या साथीदारांनी परिसरात दहशत निर्माण केली. ही तरुणी नेमकी कोण आहे आणि ती या गुन्हेगारी टोळीत कशी सामील झाली, याचा शोध आता पोलीस घेत आहेत.
नागरिकांची पळापळ आणि पोलीस तपास
टोळीच्या दहशतीमुळे नागरिकांनी भीतीपोटी स्वतःला घरांत कोंडून घेतले, तर रस्त्यावरील लोकांची मोठी पळापळ झाली. घटनेची माहिती मिळताच हडपसर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. सध्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात असून, या पाचही आरोपींचा शोध सुरू आहे. पुण्यातील वाढती गुन्हेगारी आणि त्यात तरुणींचा होत असलेला सहभाग हा आता चिंतेचा विषय बनला आहे.