दसरा आणि दिवाळी हे सण जवळ येताच सगळ्यांची गावी जाण्याची लगबग सुरु होते. पण यंदा विमानाने प्रवास करणाऱ्या अनेक प्रवाशांसाठी एक वाईट बातमी आहे. नेमक्या सणांच्या तोंडावरच विमान कंपन्यांनी तिकिटांचे दर गगनाला भिडवले आहेत.
जाणून घ्या नेमके दर किती?
खरं तर नागपूरहून बाहेर जाणाऱ्या असंख्य प्रवाशांनाच याचा सर्वात जास्त फटका बसतोय. जिथे सामान्य दिवसात साधारण 5 ते 7 हजारात तिकीट मिळायचं, तिथे आता थेट दुप्पट-तिप्पच पैसे प्रवाशांना मोजावे लागत आहेत. नागपूर ते मुंबई अशा दीड तासाच्या प्रवासासाठी आता तब्बल 22 हजार 800 रुपयांपर्यंत मोजावे लागत आहे, अशी माहिती आहे. मुंबईहून जर नागपूरला जायच म्हटलं तरीसुद्धा 15 ते 22 हजारांचा भुर्दंड प्रवाशांना पडतोय.
तर दुसरीकडे पुणे-नागपूरसाठीही बारा हजार ते पंधरा हजार, बंगळुरु-नागपूरसाठी पंधरा ते अठरा हजार रुपये आकारले जात आहेत. जर महाराष्ट्राच्या बाहेर जसं की, हैदराबादला जायचं असेल तर 13 ते 17 हजार रुपये, दिल्ली-नागपूर या मार्गावर 17 हजारापंर्यंत या तिकीटांचे दर गेले आहे.
प्रवाशांनी घेतला महत्त्वाचा निर्णय
प्रवाशांची वाढती गर्दी आणि मागणी वाढल्याचे कारण देत कंपन्यांनी हे दर वाढवले आहेत, त्यामुळेच अनेकांनी आपल्या विमान प्रवासाचे नियोजन रद्द करत रेल्वे किंवा बस प्रवासाला वेगळी पसंती दिलेली आहे. सणाच्या आनंदावरच या महागाईने विरजण घातलं आहे.