Monday, February 09, 2026 01:58:58 PM

Ajit Pawar Funeral: ‘आमच्या दादांना नेऊ नका’, ग्रामस्थांचा टाहो; काटेवाडीतून अजीतदादांचा अखेरचा प्रवास सुरू

विमान अपघातात निधन झालेले उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा अखेरचा प्रवास आज काटेवाडी येथील निवासस्थानातून सुरू झाला आहे.

ajit pawar funeral  ‘आमच्या दादांना नेऊ नका’  ग्रामस्थांचा टाहो काटेवाडीतून अजीतदादांचा अखेरचा प्रवास सुरू

बारामती: ज्या भूमीने त्यांना लहानाचं मोठं केलं आणि ज्या मातीशी त्यांचं रक्ताचं नातं होतं, त्याच काटेवाडीच्या घरून आज अजितदादांचा अखेरचा प्रवास सुरू झाला आहे. बुधवारी झालेल्या भीषण विमान अपघातात अजित पवार यांच्या अकाली निधनामुळे संपूर्ण राज्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. आज गुरुवारी सकाळी त्यांचे पार्थिव बारामती वैद्यकीय महाविद्यालयातून काटेवाडी येथील त्यांच्या निवासस्थानी आणण्यात आले होते, तेव्हा उपस्थित असलेल्या प्रत्येकाच्या काळजाचा ठोका चुकला.

'आमच्या दादांना नेऊ नका...' : ग्रामस्थांचा टाहो

अजित पवार यांचं बालपण आणि त्यांच्या राजकीय प्रवासातील अनेक महत्त्वाचे क्षण काटेवाडीतील याच घराशी जोडलेले होते. सणासुदीला सर्व प्रोटोकॉल बाजूला ठेवून आपल्या आप्तेष्टांमध्ये रमणारे 'दादा' आज निपचित पडलेले पाहून ग्रामस्थांचा अश्रूंचा बांध फुटला. निवासस्थानाबाहेर सकाळपासूनच हजारोंच्या संख्येने लोक जमले होते.

जेव्हा त्यांचे पार्थिव रुग्णवाहिकेतून विद्या प्रतिष्ठानच्या दिशेने नेण्यासाठी हलवण्यात आले, तेव्हा तिथे उपस्थित असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आणि महिलांनी एकच टाहो फोडला. "थांबा ना... आमच्या दादांना नका घेऊन जाऊ कुठे... आम्ही पाया पडतो तुमच्या," अशी आर्त साद घालत कार्यकर्ते रुग्णवाहिकेला बिलगले होते. लाडक्या नेत्याला शेवटचा निरोप देताना काटेवाडीतील महिलांनाही हुंदके आवरता आले नाहीत. "आमचा दादा महाराष्ट्राचा मोठा नेता होता," अशा शब्दांत भावना व्यक्त करताना या भगिनींच्या डोळ्यांतील अश्रू थांबण्याचे नाव घेत नव्हते.

हेही वाचा: Ajit Pawar Funeral: काटेवाडीत अजित पवारांना पोलिसांकडून मानवंदना; अखेरचा निरोप देण्यासाठी जनसागर लोटला

विद्या प्रतिष्ठानच्या मैदानात अखेरचा निरोप

काटेवाडीतील दर्शन आटोपल्यानंतर अजित पवार यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी विद्या प्रतिष्ठानच्या प्रांगणात नेण्यात येत आहे. या ठिकाणी सकाळपासूनच राज्याच्या कानाकोपऱ्यातून हजारो कार्यकर्त्यांनी गर्दी केली आहे. देशातील आणि राज्यातील अनेक दिग्गज राजकीय नेते बारामतीत दाखल झाले असून, पुढील काही वेळात त्यांच्या पार्थिवाला मुखाग्नी दिला जाईल.

महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी पोकळी

अजित पवार यांच्या जाण्याने बारामतीच्या विकासाचा कणा निखळला असल्याची भावना स्थानिक व्यक्त करत आहेत. प्रशासनावर असलेली पकड, कामाचा प्रचंड उरक आणि स्पष्टवक्तेपणा यामुळे त्यांनी राजकारणात स्वतःचा वेगळा ठसा उमटवला होता. नियतीने त्यांच्यावर आणि पर्यायाने महाराष्ट्रावर घातलेला हा घाला कधीही भरून न येणारा आहे.

हेही वाचा: Ajit Pawar Driver: 'रात्रीच कारने बारामतीला जाऊ...', ड्रायव्हरचा सल्ला दादांनी ऐकला असता तर...


सम्बन्धित सामग्री